- महेश पाळणे
लातूर :लातूरचा उदयोन्मुख डावखुरा अष्टपैलू खेळाडू एकनाथ संतोष देवडेने गुजरातमधील राजकोट येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत बडोद्याविरुद्ध ११५ धावांची शतकी खेळी करीत राज्याच्या संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.
बडोदा संघाने प्रथम फलंदाजी करीत ४४७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्र संघाने आठ गड्यांच्या मोबदल्यात ३७७ धावा केल्या. यात सलामीला आलेल्या डावखुऱ्या एकनाथ देवडेने १९४ चेंडूंत ११५ धावा ठोकल्या. यात तीन षटकार व १८ चौकारांचा समावेश होता. हा सामना एकनाथच्या शतकी खेळीमुळे अनिर्णित राहिला. मूळचा लातूरचा असलेला एकनाथ पॅकर्स क्रिकेट क्लबचा खेळाडू असून, सध्या तो पुण्याच्या आर्यन्स क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करतो. या यशाचे पॅकर्स क्लबचे अध्यक्ष उल्हास भोयरेकर, सचिव दिवाकर शेट्टी, मदन रेड्डी, सुशील सुडे, संगीत रंदाळे, कृष्णा राव, शफी टाके, मोहसीन शेख, अभय गडकरी, नवनाथ डांगे यांनी कौतुक केले आहे.
मुंबईविरुद्ध ७९ धावा...तत्पूर्वी झालेल्या मुंबईविरुद्धच्या अनिर्णित राहिलेल्या सामन्यात लातूरच्या एकनाथने ७९ धावांची खेळी केली होती. यासह लेगस्पीन करीत एक बळीही मिळविला होता. गतवर्षीही त्याने १४ वर्षे वयोगटात राज्याचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र यंदाच्या वर्षात त्याने कामगिरीत सुधारणा करून बडोद्याविरुद्ध शतकी खेळी केली आहे.