लातूर : लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांची स्मार्ट सिटी नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर- घुगे यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान, लातूर जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल यांची धुळे येथे जिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे. त्याच्या जागी गोंदिया येथील सहाय्यक जिल्हाधिकारी अनमोल सागर यांची नियुक्ती झाली आहे. या बदलींचे आदेश राज्य शासनाने शुक्रवारी रात्री काढले आहेत.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी डिसेंबर २०२० मध्ये लातूर येथील पदभार स्विकारला होता. अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांनी आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्याची केंद्र शासनाने दखल घेत प्रधानमंत्री उत्कृष्ट नागरी प्रशासन पुरस्काराने पंतप्रधानांच्या गौरविण्यात आले आहे. शेत, पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करणे आदी उपक्रम त्यांनी राबविले.
जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल यांनी १५ जुलै २०२० मध्ये पदभार स्विकारला होता. तीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढीसाठी बाला, हॅपी होम अंगणवाडी, श्री सिध्दीविनायक प्रतिष्ठाणच्या सहकार्याने उमंग इन्स्टिट्यूट ऑफ ऑटिझम ॲण्ड मल्टीडिसेबिलिटी रिसर्च सेंटर, महिलांसाठी संजीवनी अभियान राबविले.
लातूरच्या पहिल्याच महिला जिल्हाधिकारी...लातूर जिल्हा निर्मितीपासून आतापर्यंत जिल्हाधिकारी म्हणून महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नव्हती. जि.प. सीईओ पदावर यापूर्वी श्यामला शुक्ला यांनी सन १९९८- ९९ वर्ष पदभार सांभाळला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्याच्या प्रमुख अधिकारी म्हणून वर्षा ठाकूर- घुगे यांची जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे.