लातूर : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या भारतीय वनसेवा परीक्षा २०२३ (आयएफएस) चा निकाल बुधवारी जाहीर झाला असून, त्यात लातूर येथील प्रतीक्षा भाग्यश्री नानासाहेब काळे महाराष्ट्रात पहिली, तर देशात दुसरी आली आहे. मेळघाटच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये सहायक वनसंरक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या प्रतीक्षाचे बारावीपर्यंतचे शिक्षण लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात, तर पुणे येथील सीओईपीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या वनसेवा परीक्षेतही प्रतीक्षा राज्यात पहिली आली होती.
अभियांत्रिकी शिक्षणात सर्वोच्च गुणवत्ता प्राप्त करूनही लोकसेवेच्या आवडीमुळे प्रतीक्षाने स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडला. एमपीएससीमध्ये राज्यात पहिली आल्यानंतर गेली साडेतीन वर्षे तिने वन खात्याच्या प्रसिद्धी समितीत काम केले. तसेच प्रतीक्षाने राज्याच्या विविध विभागात सहायक वनसंरक्षक म्हणून काम केले. यशानंतर प्रतीक्षा म्हणाली, माझे हे यश परीक्षेतील आहे. खरे यश भविष्यातील माझ्या कामातून दिसून येईल.
प्रशासकीय सेवा संधी आणि जबाबदारी...देशपातळीवर अव्वल स्थान मिळविल्यानंतर प्रतीक्षा काळे हिने ‘लोकमत’ला सांगितले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आवड आणि जिद्द पडताळून पाहावी. ती केवळ संधी नसून मोठी जबाबदारीसुद्धा आहे. दरम्यान, तिने आपल्या यशाचे श्रेय वडील प्रा. नानासाहेब काळे, आई भाग्यश्री आणि बहीण प्रांजली तसेच आपल्या सर्व शिक्षकांना दिले आहे.