लातूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे लातूर विभागात पाच डेपो आहेत. या पाच डेपोंसाठी जवळपास ५०० बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी असून, या सर्व बसेसचा प्रवास दररोज एक लाख ८० हजार किलोमीटर होतो. त्यासाठी ४० हजार लिटर डिझेल खर्च जाते. विशेष म्हणजे आता प्रवाशांची गर्दी चांगली असून, एसटी तोट्यातून नफ्यात आली आहे.
कोरोनानंतर एसटी सुसाट झाली आहे. वेगवेगळ्या योजना आणि चांगल्या सुविधा प्रवाशांना मिळत असल्यामुळे महामंडळाच्या बसकडे प्रवासी वळले आहेत. मे महिना एसटीचा नफ्यात गेला आहे. सध्या यात्रा-महोत्सव सुरू होत असून, जवळपास १२५ बसेस आषाढी पंढरपूर यात्रेसाठी सोडल्या जाणार आहेत. २४ जूनपासून वारकऱ्यांच्या सेवेसाठी बसेस धावणार आहेत. दरम्यान, लातूरच्या एसटीला सर्वसाधारण ४० हजार लिटर दररोज डिझेल लागते. या डिझेलवर एक लाख ८० हजार किलोमीटर एसटी धावते.
महिन्याला एक कोटी वीस लाख लिटर डिझेल...लातूर विभागातील लातूर, अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर या पाच आगारातील सर्व बसेसना मिळून दररोज ४० हजार लिटर, तर महिन्याला एक कोटी २० लाख लिटर डिझेल लागते. दररोज या बसेसचा एक लाख ८० हजार किमी अंतराचा प्रवास होत होता, अशी माहिती भंडार कक्षाचे प्रमुख राजगिरे यांनी दिली.
पंढरपूर यात्रेसाठी प्रत्येक बसला प्राथमिक उपचार किट..जिल्ह्यातील पाचही आगारातून पंढरपूर यात्रेसाठी बसेस सोडल्या जाणार आहेत. आगारनिहाय बसचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व बसेसचे स्वच्छता करण्यात आली असून, प्रत्येक बसला प्रथम उपचार किटस बसविण्यात आले आहे. प्राथमिक उपचारासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची सोय प्रथमोपचार पेटीमध्ये करण्यात आली आहे. सर्व आगाराला पाचशे प्रथमोपचार पेट्या वितरित करण्यात आल्या आहेत.
आगारनिहाय बसेसची संख्या...लातूर ११६, उदगीर १३०, अहमदपूर ८५, निलंगा ९०, औसा ७५.