- महेश पाळणे
लातूर : रूस्तूम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामांची मल्लविद्या जगभर गाजली़ त्यांच्या शिष्यांनी अनेक आखाडे गाजवत भारतात लातूरची मल्लविद्या प्रसिद्ध केली़ तीच परंपरा अर्जुनवीर काका पवारांनी पुढे चालू ठेवली असून, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महाराष्ट्र केसरी, उपकेसरी व तब्बल १० सुवर्ण पदके पटकावून राज्यात आपले वर्चस्व सिद्ध केले़ त्यामुळे लातूरची मल्लविद्या राज्यात श्रेष्ठ ठरली़
तब्बल ३१ वेळा भारताकडून प्रतिनिधीत्व करत पदके मिळवून देणाऱ्या अर्जून पुरस्कार विजेते काका पवार यांचे पुण्यात आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल असून, त्याअंतर्गत जवळपास पावणे तीनशे मल्ल नियमित सराव घेतात़ जवळपास ५० मल्लांनी यात सहभाग नोंदविला होता़ त्यातील विविध वजनगटात त्यांच्या शिष्यांनी १० सुवर्ण, ७ रौप्य व पाच कांस्यपदकाची कमाई करत प्रमुख लढतीतील दोन्ही बहुमान पटकावत राज्यात प्रथम येण्याचा पराक्रम केला़ त्यामुळे लातूरची मल्लविद्या पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे़
प्रत्येक वजनी गटात काका पवारांच्या पठ्यांचाच संपूर्ण स्पर्धेत बोलबाला राहिला़ महाराष्ट्र केसरीतील एकूण ६० पदकांपैकी २२ पदके पटकावत काकांच्या तालमीने मैदान गाजवत राज्यात अव्वल येण्याचा बहुमान मिळविला़ काका पवारसह शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार, शरद पवार, सुनिल लिमन, विशाल माने, बदाम मुकदूम, प्रकाश घोरपडे, अमोल काशिद यांचेही या मल्लांना मार्गदर्शन लाभले़
तुफानी खेळी करत या मल्लांनी पदकावर कोरले आपले नाव
महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर, उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळक यांच्यासह ज्योतीबा आटकळे, आबा आटकळे, नामदेव कोकाटे, अक्षय हिरगुडे, कालिचरण सोलंकर, रामा कांबळे, दादा शेळके, शुभम चव्हाण, संतोष हिरगुडे, दिनेश मोकाशे, आबा मदने, जयदिप गायकवाड, देवानंद पवार, श्रीकांत निकम, गणेश जगताप, स्वप्नील काशिद, रमेश कुकडे, संतोष हिरगुडे, धर्मा शिंदे यांनी सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकावर आपले नाव कोरले़
काकांच्या मागणीला यशस्पर्धेपूर्वी काका पवार यांनी स्पर्धेपूर्वी मल्लांच्या डोपिंग टेस्टची मागणी केली होती़ याची दखल घेत कुस्तीगीर परिषदेने उत्तेजकद्रव चाचणी घेतली़ प्रथमच या स्पर्धेत ही चाचणी झाली़