रेणापूर : शासनाकडून गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार योजना राबविली जात असून, जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ रेणापूर तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पाच्या पानगाव-तळेगाव रस्त्यालगत गाळ उपसा सुरू असलेल्या ठिकाणी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता कांबळे, तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड, पाटबंधारे उपविभागीय अधिकारी निटुरे, शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी, शिवसेनेचे रेणापूर तालुका प्रमुख गोविंद दुड्डे, सेवा सहकारी सोसायटी पानगावचे चेअरमन गणेश वांगे, तलाठी डी. डी. कराड यांच्यासह शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
शेतशिवाराची सुपिकता वाढणार...विविध तलावातील साठवण क्षमता वाढावी, त्यामधील गाळ काढून तो शेतशिवारात टाकता यावा, यासाठी शासनातर्फे गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना राबविली जात आहे. त्याअंतर्गत रेणापूर तालुक्यात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेमुळे शेतशिवाराची सुपिकता वाढणार असून, उत्पादकतेमध्ये वाढ होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.