लातूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात दररोज १५० लर्निंग लायसन्स देण्याची सोय आहे. यासाठी अगोदर ऑनलाईन अर्ज भरून शुल्क भरणा केल्यावर वेळ दिला जातो. आपल्याला दिलेल्या वेळेत कार्यालयात आल्यावर अर्जदाराची परीक्षा घेतली जाते. कार्यालयात परीक्षा होत असल्याने दररोज शेकडोजण येतात. हीच गर्दी कमी व्हावी, यासाठी कार्यालयात न येताच ऑनलाईन परीक्षा देण्याची सोय करण्यात आली असली तरी त्यात अनेक त्रुटी आहेत. संकेतस्थळ परिपूर्ण झाले नसल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडे अर्जदारांची ओरड वाढली आहे.
ऑनलाईनसाठी अडचणी काय...
अर्ज भरताना ओटीपी येत नाही. आलाच तर पासवर्ड मिळत नाही. दोन्ही आले तर आधार लिंकिंगमध्ये अडचणी येतात. अर्ज भरताना आधार लिंकिंग कार्यक्रम असल्याने अर्जदार पुरुष असेल तर महिलेचे छायाचित्र येते. अन् महिला असेल तर पुरुषाचे छायाचित्र येते. वैद्यकीय प्रमाणपत्र सेल्फ असल्याने त्यात भरताना काही चूक झाली तर ती दुरुस्तीची कार्यालयात सोय नाही. अनेकजण त्यात चुका करतात. बँकेला आधार लिंक नसेल तर अर्ज भरताना दिलेले शुल्कही परत येत नाही. परिणामी ऑनलाईनपेक्षा कार्यालयात एक चक्कर झालेली बरी, म्हणून अनेकजण आरटीओच्या दारात गर्दी करीत आहेत.
म्हणून आरटीओ कार्यालय गाठले...
परिवहन विभागाने ऑनलाईन सुविधा दिल्याने आनंद झाला होता; मात्र संबंधित संकेतस्थळावर अर्ज भरताना अनेक अडथळे येत आहेत. चूक झाली की दुरुस्तीला संधी नाही. ओटीपी येत नाही, आला तर पासवर्डची अडचण. वेळ घालवूनही काम होत नसल्याने कार्यालयातच आलो. - संतोष केदार
...................................
आधार लिंकिंग होत नाही. झालेच तर दुसऱ्याचाच फोटो लिंक होतो. शुल्क भरणा केला तरी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. पुन्हा पैसेही परत मिळत नाहीत. ज्यांचे बँक खात्याशी आधार लिंक आहेत, त्यांनाच पैसे मिळतात. ऑनलाईन परीक्षा सोयीची नसून गैरसोयीचीच अधिक आहे. - सादिक शेख
.................................
ऑनलाईन परीक्षेसाठी अर्जदारांना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अनेकजण कार्यालयात येऊन परीक्षा देत आहेत. आपल्याकडे कार्यालयात सुविधा असल्याने गैरसोय होत नाही. परंतु ऑनलाईनसाठी प्रयत्न करणाऱ्यांची ओरड आहे. - विजय भोये, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.
वर्ष लर्निंग लायसन्स परमनंट लायसन्स
२०१९ ५०,९२३ १८,७३९
२०२० ५४, २५३ २०,३४१
२०२१ (मे) ४५,६३३ १७०५३