आशपाक पठाण/ लातूर : वाहन परवाना काढण्यासाठी परिवहन विभागाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे लर्निंग लायसन्स काढणे आता सोपे झाले आहे. ऑनलाईन अर्ज भरणा केल्यावर आरटीओ कार्यालयात परीक्षा घेतली जाते. तसेच ऑन कॅमेरा बाहेरूनही परीक्षा देते येते. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून परिवहन विभागाची वेबसाईट राज्यभर बंद पडल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहनधारकांना तारीख पे तारीख दिली जात आहे.
लातूर येथील आरटीओ कार्यालयात दररोज जवळपास ५० ते ६० जण परीक्षा देतात. ऑनलाईन होणारी ही परीक्षा इनकॅमेरा घेतली जाते. परीक्षेत वाहतुकीच्या नियमावर प्रश्नावली असते. ज्यांना वाहतूक नियमांची माहिती असे वाहनधारक चांगल्या गुणांनी परीक्षा उत्तीर्ण होतात. अनेकदा लर्निंग लायसन्स काढण्यापूर्वी वाहनधारकांना वाहतूक नियमांच्या अभ्यासासाठी माहिती दिली. त्यामुळे अनुत्तीर्णतेचे प्रमाण अत्यल्प आहे. राज्यस्तरावर असलेली वेबसाईट मागील पाच दिवसांपासून बंद पडल्याने नागरिकांना कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. वेबसाईट कधी सुरू होणार, याबाबत खात्रीने कोणीच माहिती देत नसल्याची ओरड वाढली आहे.
तीन दिवसांपासून चकरा मारतोय...अहमदपूर, चाकूर, रेणापूर, औसा, मुरूड आदी भागातील नागरिक दुचाकी, चारचाकीच्या लर्निंग लायसन्सची परीक्षा देण्यासाठी लातूरच्या आरटीओ कार्यालयात मागील तीन दिवसांपासून चकरा मारत आहेत. मात्र साईट बंद असल्याचे कारण दिले जात असल्याने दिवसभर थांबून परत जावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टीचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
जुनी ऑफलाईनच बरी होती...परिवहन विभागातील अनेक सुविधा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची सोय झाल्याचा दावा केला जात असला तरी वारंवार होणारा तांत्रिक बिघाड अनेकांना त्रासदायक ठरत आहे. ऑनलाईनच्या नावाखाली उगाच कार्यालयाला खेटे मारावे लागत आहे. यात उलट नुकसान होत असल्याची ओरड नागरिकांची आहे.
१०० जणांना मिळते लायसन्स...
आरटीओ कार्यालयात दररोज जवळपास ४० ते ५० जण लर्निंग लायसन्ससाठी परीक्षा देतात. काहीजण पूर्वीचे दुचाकीचे लायसन्स असल्यावर इतर परवान्यासाठी अर्ज करतात. त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जात नाही. दोन्ही प्रकारचे मिळून दररोज जवळपास १०० ते ११० परवाने दिले जातात. मात्र वेबसाईट बंद पडल्याने अडचण झाली आहे. यासंदर्भात केंद्र स्तरावर असलेल्या एनआयसीच्या पुणे कार्यालयाला कळविले आहे. लवकरच तांत्रिक अडचण दुर होईल. - आशुतोष बारकुल, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, लातूर.