औसा : लातूरकडे निघालेली एसटी आलमला मोडजवळ आली असता समोरून जात असलेले कंटेनर अचानकपणे थांबले. त्यामुळे धास्तावलेल्या बसचालकाने प्रसंगावधान राखून एसटी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला मात्र, महामार्गालगतच्या खड्ड्यात बस गेली. यात बसचे किरकोळ नुकसान झाले असले तरी मोठा अनर्थ टळल्याने प्रवाशांनीही समाधान व्यक्त केले.
निलंगा ते लातूर ही बस मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास लातूरकडे निघालेली बस आलमला मोडजवळ आली असता, समोर जाणारे कंटेनर अचानकपणे मध्येच थांबल्याने घाबरलेल्या चालकांनी आपल्यासह प्रवाशांचे जीव वाचण्यासाठी चक्क गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. पण, बस चक्क खड्ड्यात गेली. चाके मातीत रुतली, समोरचे नुकसान झाले. पण, सदरील एसटी बाजूला घेतली नसती तर मोठा अपघात घडला असता कारण बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ६२ प्रवासी होते. यातील ८ प्रवासी चालकाच्या केबिनमध्ये होते. दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला आहे.
बसमध्ये होते ६२ प्रवासी...निलंगा आगाराची एम एच २० बीएल २०२९ ही एसटी निलंग्याहून लातूरकडे जात होती. यात एकूण ६२ प्रवासी प्रवास करत होते. औशाहून पुढे गाडी जात असताना आलमला मोडवर जवळच सदरची बस खड्ड्यात गेली. प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी महामार्गाच्या बाजूला गेल्याने अनेकांचा जीव वाचला. जर कंटेनर थांबल्याने चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला असता तर बस कंटेनरवर आदळल्याने अनेकांना मार लागला असता. कारण या बसला वेगात ब्रेक लागणे कठीण होते. मी घाबरून एसटी बाजूला घेतली, पण ती खड्ड्यात गेल्याचे चालक अभिमन्यू भोसले यांनी सांगितले.