लातूर : लातूर तालुक्यातील नागझरी व रेणापूर तालुक्यातील इंदरठाणा परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वनविभाग सतर्क झाला असून, दोन्ही गावामध्ये गस्त सुरू केली असून, दोन पथकांमार्फत शोध घेतला जात आहे.
लातूर आणि रेणापूर तालुक्यातून नदी वाहत असल्याने उसाचे क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि ऑगस्ट महिन्यांच्या कालावधीत बिबट्याचे दर्शन होते. १५ दिवसांपूर्वी रेणापूर भागात काही शेतकऱ्यांना बिबट्या आढळून आला होता. तसेच एका हरणाची आणि श्वानाची शिकार केल्याचे वनविभागास पाहणीत आढळून आले होते. दरम्यान, शोध घेण्यास सुरुवात केली असता पाऊलखुणा आढळल्या नाहीत. तद्नंतर रेणापूर तालुक्यातील इंदरठाणा परिसरात बिबट्या दिसल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी लातूर तालुक्यातील नागझरी येथील मंदिराच्या बाजूस असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे वनविभागाचे कर्मचारी तिथे पोहोचले. परंतु, पायांचे ठसे आढळले नाहीत.
नागरिकांनी सतर्क राहावेनागझरी, इंदरठाणा परिसरात बिबट्याचा वावर सुरू आहे. दोन पथकांमार्फत शोध घेतला जात आहे. मात्र, त्याच्या पाऊलखुणा आढळल्या नाहीत. नागरिकांनी सतर्क राहावे. रात्री शेतात एकट्याने फिरू नये. जनावरे गोठ्यात बांधावी.- सचिन रामपुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी