"तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडो"; अजित पवारांवरील प्रश्नावर सुप्रिया सुळेचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 05:06 PM2023-09-07T17:06:11+5:302023-09-07T17:15:31+5:30
अंबाजोगाई येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी खा. सुप्रिया सुळे गुरुवारी सकाळी लातूरमार्गे आल्या होत्या
मुंबई/लातूर - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीवरुन अद्यापही संभ्रम आहे. दोन्ही गटांकडून सातत्याने वेगवेगळी विधानं केली जातात. त्यामुळे, अजित पवार पुन्हा स्वगृहीत म्हणजे शरद पवारांसमवेतच्या राष्ट्रवादीत परत येतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होत असते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर, उत्तर देताना त्यांनी शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख असल्याचं म्हटलं.
अंबाजोगाई येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी खा. सुप्रिया सुळे गुरुवारी सकाळी लातूरमार्गे आल्या होत्या. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी अजित पवारांच्या परत येण्याबद्दल सूचक विधान केलं. अजित पवार राष्ट्रवादीत शरद पवारांसोबत येतील का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर, "तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडो..,आता दोन भाऊ वेगळ्या रो हाऊसमध्ये राहतात, मध्ये फक्त कंपाऊंड आहे, " असे सूचक विधान सुप्रिया सुळेंनी केलं. तसेच, "ही वैचारिक लढाई आहे, निवडणुकीच्या वेळी ती राजकीय लढाई होईल. राष्ट्रवादीत कुठलीही फूट नाही, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत," असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
फडणवीसांनी आमच्या घरासमोर आश्वासन दिले होते
राज्यात दुष्काळ आहे. चारा पाण्याची सोय नाही. पाऊस झाला नसल्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये टंचाई आहे. यावर शासनाकडून कोणत्याच उपाययोजना नाहीत. शिवाय, वेगवेगळ्या समाजाच्या मागण्यांवरही सरकार गंभीर नाही. मराठा समाजासह लिंगायत, मुस्लिम, धनगर या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन बारामती येथे आमच्या घरासमोर सभा घेऊन दिले होते. त्यांना त्याचा विसर पडला आहे. जालना जिल्ह्यात तर आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवरच पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्याला जबाबदार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले.
विशेष अधिवेशन बोलवावे
आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य आणि केंद्र शासन गंभीर नाही. मराठा समाजासह धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न संवेदनशील आहे. मात्र, शासनाकडे धोरण नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र शासनाने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.