लातूर : श्री गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली आहे़ लातूर शहरांसह जिल्ह्यातील गणेश मंडळांनी जय्यत तयारी सुरू केली आहे़ यंदाचा हा उत्सव विधायक उपक्रमाबरोबरच डॉल्बीमुक्त झाला पाहिजे़ यासाठी मंडळ पदाधिकारी, ग्रामस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. समाजाला दिशा देणारे उपक्रम घ्या...असे मत पोलीस अधीक्षक डॉ़ राजेंद्र माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले ़
ध्वनी प्रदूषणमुक्तीसाठी मंडळ आणि नागरिकांनी काय करावे?मर्यादेपेक्षा अधिक आवाज वाढविल्यानंतर ध्वनी प्रदूषण होते़ यातून त्या-त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना त्रास होतो़ हे टाळण्यासाठी कर्कश आवाजांचे वाद्य टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले पाहिजे़ हे करत असताना नियमांचे मात्र पालन केलेच पाहिजे़
मंडळांनी उत्सवकाळात काय खबरदारी घेतली पाहिजे?श्री गणरायाची प्रतिष्ठापना करताना कायदेशीर बाबींची पूर्तता प्राधान्याने केली पाहिजे़ पोलीस आणि प्रशासनाने घातलेल्या अटी, नियमांचे उल्लंघन टाळले पाहिजे़ शांतात ठेवण्यासाठी संबंधित मंडळ पदाधिकाऱ्यांनी जागरूक अन् दक्ष राहण्याची गरज आहे़
उत्सवासाठी प्रशासन स्तरावर नेमकी काय तयारी सुरू आहे?लातूर शहरासह जिल्हाभरातील गणेश मंडळ, नागरिकांच्या शांतता बैठका आम्ही घेत आहोत. शिवाय, रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे कोम्बिंग आॅपरेशन सुरु करण्यात आले आहे. तर काहींना नोटिसाही बजावल्या जातील. कायदा मोडणाऱ्यांची कुठलीही गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
स्थानिकांनी काय काळजी घ्यावी?गणेशोत्सव काळात नागरिक, पोलीस अन् मंडळ पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय महत्वाचा आहे. सार्वजनिक शांतता अखंड रहावी, यासाठी मंडळांनी दक्ष राहिले पाहिजे. यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. उत्सवकाळात सर्वत्र पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ़ राजेंद्र माने म्हणाले़
परवानगी घ्यावी..गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनी संबंधित प्रशासनाकडून रितसर परवानगी घ्यावी़ परवान्यामध्ये दिलेल्या नियम आणि अटी जाणीवपूर्वक पाळाव्यात़ शांततेसाठी मंडळाबरोबर नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजऱ़़गणेशोत्सव काळात निघणाऱ्या मिरवणुकांचे व्हिडिओ चित्रीकरण होणार असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे़ संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तासाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात केला जाईल. अतिसंवेदनशील गाव आणि ठिकाणांची पाहणी करण्यात आली असून, येत्या आठवड्यात शांतता कमिट्यांच्या बैठकांवर अधिक भर दिला जाईल. विधायक उपक्रमाबरोबर शांततेत उत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांसह मंडळांनी विशेष पुढाकार घ्यावा़ समाज उपयोगी उपक्रमांना अधिक प्राधान्य द्यावे, असेही पोलीस अधीक्षक डॉ़ राजेंद्र माने म्हणाले़