- आशपाक पठाण
लातूर : लातूर लोकसभा राखीव मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रशासनाकडून जनाजगृती करण्यात येत आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान आहे. या निवडणुकीत किमान ७५ टक्के उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यासाठी विविध प्रकारच्या माध्यमातून मतदारांचे प्रबोधन केले जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार काम सुरू असल्याचे सांगत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले, यावर्षी उमेदवारी अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशासन मतदारसंघात जनजागृती मोहीम राबविण्यावर भर देणार आहेत. पोस्टर्स, पॉम्प्लेटच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करीत आहोत. होळीच्या निमित्ताने व्हीडिओ क्लीप तयार केली असून, ती समाज माध्यमातून व्हायरल करण्यात आली आहे. यातून जास्तीत जास्त तरुणांपर्यंत संदेश पोहोचविण्याचे काम केले जात आहे. अंध, अपंग किंवा ज्येष्ठ नागरिक (ज्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचणे शक्य नाही) अशा नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने वाहनांची सोय केली आहे. आमचा निवडणूक रथ गावा-गावात, प्रभागातील बूथवर मतदानासाठी अशा मतदारांना पोहोचविण्याचे काम करणार आहे. रेल्वे स्टेशन, बसस्थानक, शासकीय कार्यालये व गावस्तरावर सार्वजनिक ठिकाणी पोस्टरच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व विशद केले जात आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन केले जात आहे. या संदर्भात २८ मार्चपासून प्रचार व प्रसार करण्याचे काम वाढविले जाणार आहे.
पालकांना विद्यार्थ्यांचे पत्र... मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी शहरातील विशेष म्हणजे उच्चभ्रू शाळेत ईव्हीएम मशीनचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला जाईल. शिवाय, सदरील विद्यार्थी आपल्या पालकांना मतदानासाठी आवाहन करणारे संकल्प पत्र लिहितील. यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले.
सैनिकांसाठी विशेष सुविधा... लातूर लोकसभा मतदारसंघात नोकरीच्या निमित्ताने जवळपास साडेचार हजार मतदार बाहेरगावी आहेत. यात विशेष म्हणजे सैनिकांची संख्या अधिक आहे. त्यांनाही मतदान करता यावे, यासाठी पोस्टाच्या माध्यमातून मतपत्रिका पाठविल्या जातील. संबंधित व्यक्ती मतदान करून त्या मतपत्रिका पोस्टाद्वारे परत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवतील. यासाठी साडेचार हजार जणांना मतपत्रिका पाठविण्याची तयारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.