लातूर : लेफ्टनंट कमांडर शिरीष शिवनाथ पावले यांना समुद्रातील एका बोटीवरील बंदिवानांची सुटका करण्याच्या विशेष मोहिमेतील शौर्याबद्दल नौसेना पदक प्रजासत्ताक दिनी जाहीर झाले.
शिरीष पावले मूळचे अहमदपूर येथील असून, त्यांच्या शौर्य कार्याने लातूर जिल्ह्यासह अहमदपूरचा लौकिक वाढला आहे. लेफ्टनंट कमांडर पावले हे ‘आयएनएस अभिमन्यू’वर तैनात होते. समुद्रातील एका बोटीवर काहींना बंदी करण्यात आल्याची खबर मिळाली होती. त्यावेळी शिरीष पावले यांच्या नेतृत्वाखालीेल पथकाने ३ मार्च २०१८ च्या मध्यरात्री बचावकार्य करून बोटीवरील बंदिवानांची सुटका केली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांच्या या धैर्याची आणि कुशल नेतृत्वाची दखल घेऊन नौसेना पदक जाहीर झाले आहे.
दरम्यान, लेफ्टनंट कमांडर शिरीष पावले यांच्यासमवेत देशभरातून ७ जणांना नौसेना पदकाने सन्मानित केले जाणार आहे. शिरीष पावले हे मूळचे अहमदपूर येथील असून, त्यांचे शालेय शिक्षण सातारा सैनिक स्कूलमधून तर एनडीएचे प्रशिक्षण पुणे येथून झाले आहे.