लातूर : शिरूर अनंतपाळ येथील एका विवाहितेच्या खून प्रकरणी लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
लातूर तालुक्यातील धनेगाव येथील आनंद एकनाथ मेखले यांची मुलगी दीपालीचा विवाह शिरूर अनंतपाळ येथील सचिन उर्फ विठ्ठल बालाजी धडे याच्याशी रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. विवाहानंतर दीपालीला चार ते पाच महिने चांगले नांदविले. मात्र आरोपी सचिन हा दारू पिऊन दीपालीला तुला स्वयंपाक चांगला करता येत नाही, या कारणावरून मारहाण करीत होता. या त्रासाला कंटाळून दीपाली आॅक्टोबर २०१६ मध्ये माहेरी धनेगाव येथे राहण्यास आली. दरम्यान, सचिनचा वाहन चालविताना अपघात झाला.
या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी लातुरातील एका रुग्णालयात दाखल झाला होता. १८ आॅक्टोबर २०१६ रोजी सचिन हा सासरवाडीत दीपालीकडे उपचारासंदर्भाने आला आणि तिथेच राहू लागला. २२ आॅक्टोबर रोजी दीपालीचे आई-वडील व भाऊ मजुरीच्या कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घरात कोणीच नसल्याची संधी साधून आरोपी सचिनने दीपालीचा चाकूने गळा कापून खून केला. गळ्यातील मंगळसूत्र घेऊन तो फरार झाला. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आई घरी परतली असता ही घटना त्यांच्या निदर्शनास आली.
याबाबत दीपालीच्या वडिलांनी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं. ३३६/२०१६ कलम ३०२, ४९८ (अ) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास सपोनि. रफिक सय्यद यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याचे कामकाज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. जोशी यांच्या न्यायालयात जलदगतीने चालविण्यात आले. सदरच्या खटल्यात कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. त्यामुळे हे प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित चालविण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने एकूण दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये डॉक्टर आणि इतर साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
सरकार पक्षाच्या साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. जोशी यांनी आरोपी सचिन उर्फ विठ्ठल बालाजी धडे याला कलम ३०२ भादंवि अन्वये जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा तर कलम ४९८ (अ) भादंवि अन्वये तीन वर्षे कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एस.आर. मुंदडा यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडली. त्यांना आक्रम काझी यांनी सहकार्य केले. पोलीस नाईक सदाशिक कडगे, ताईबाई चव्हाण यांनी सहकार्य केले.