लातूर : जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळनंतर वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला. देवणीत तर गारा पडल्या. या पावसामुळे रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, मध्यरात्री धनेगाव (ता. देवणी) येथील लक्ष्मी मंदिराच्या कलशावर वीज कोसळली. त्यामुळे कलशाचे तुकडे झाले तर मंदिराच्या गाभाऱ्यास तडे गेले आहेत.
शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे उकाडा अधिक जाणवत होता. दरम्यान, सायंकाळी शहरासह उदगीर, अहमदपूर, औराद शहाजानी, देवणी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा पिकांचे नुकसान झाले. तसेच आंब्यालाही फटका बसला. देवणी तालुक्यातील वलांडीसह परिसरात अवकाळी पाऊस झाला.
मध्यरात्रीच्या सुमारास धनेगाव येथील लक्ष्मी मंदिराच्या कलशावर वीज कोसळली. त्यामुळे कलशाचे तुकडे झाले. तसेच मंदिराच्या गाभाऱ्याला तडे ही गेले आहेत. त्यामुळे मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने पाहणी करुन मंदिराची दुरुस्ती करावी, अशी मागणी मंदिराचे पुजारी विश्वनाथ सूर्यवंशी यांनी केली.
दरम्यान, या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले असल्यास त्याचे फोटो काढून तहसील प्रशासनास अथवा तलाठी, कृषी विभागाकडे पाठवावे. त्यानंतर पहाणी करून पंचनामे केले जातील, असे तहसीलदार सुरेश घोळवे यांनी सांगितले.