उदगीर (जि. लातूर) : तीन भाषांच्या जननीचे माहेरपण आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या उदयगिरी नगरीत शुक्रवारपासून सारस्वतांचा मेळा भरत आहे. ९५ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष भारत सासणे, ज्ञानपीठ विजेते दामोदर मावजो, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, सा.बां. मंत्री अशोक चव्हाण, उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आदि मान्यवरही यावेळी उस्थित असतील.
उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्याचे प्रवेशद्वारआयोजक संस्थेने उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्याचा देखावा असलेले प्रवेशद्वार केले आहे. इ. स. १७६० मध्ये उदगीर येथे निजाम व मराठे यांच्यात लढाई झाली. यात मराठ्यांचा विजय झाला.
मराठ्यांचे नेतृत्व करणारे सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी सैन्य घेऊन पानिपत स्वारी केली. पानिपतच्या लढाईची सुरुवात उदगीरपासून झाल्यामुळे उदगीरचा किल्ला व येथे झालेल्या लढाईचे महत्त्व आहे. यामुळेच संमेलनाचे प्रवेशद्वार उदगीरच्या किल्ल्याचे करण्यात आले.
जर्मन बनावटीचा मंडप - सध्या शहरातील तापमान ४१ अंश सेल्सिअसवर आहे. उदयगिरी मैदानावरील वातावरणही तापले आहे. - सभामंडपात गर्दीमुळे उकाडा वाढेल. आयोजकांनी याची काळजी घेत उष्मा रोखणारा जर्मन हँगर बनावटीचा भव्य मंडप उभारला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा २३ एप्रिल रोजीचा नियोजित नागपूर दौरा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्याने साहित्य संमेलनाला ते उपस्थित राहू शकणार नाहीत.