लातूर : लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसत असले तरी अद्यापही पशुधनाच्या मृत्यूचे प्रमाण आहे. दरम्यान, राज्य शासनाने मार्चअखेरपर्यंत दगावलेल्या पशुधनाच्या नुकसानीपोटी पशुपालकांना अर्थसाहाय्य केले होते. एप्रिलपासून मात्र मदतीचे कुठलेही आदेश दिले नसल्याने पशुधन दगावलेले पशुपालक हतबल होऊन मदतीकडे डोळे लावून होते. यासंदर्भात ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित होताच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात आली. त्यामुळे राज्य शासनाने आर्थिक मदतीचे आदेश काढले आहेत.
राज्यात गेल्या वर्षीच्या ऑगस्टपासून गोवंशीय पशुधनात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तो रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषदेच्या वतीने लसीकरणावर भर देण्यात आला. तसेच जनावरांचे बाजार, शर्यती, प्रदर्शने, कीटकनाशक फवारणी, वाहतुकीवर बंदी असे निर्बंध लागू करण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६ हजार ९७३ पशुधनास लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यापैकी ६७० जनावरे दगावली आहेत. त्यात मार्चअखेरपर्यंत दगावलेल्या ४१३ पशुधनाच्या ३६६ पशुपालकांना मदत देण्यात आली. मात्र, उर्वरित पशुपालकांना भरपाई देण्यासंदर्भात राज्य शासनाकडून कुठलेही आदेश देण्यात आले नव्हते. परिणामी, हे पशुपालक हतबल झाले होते. विशेषत: राज्यभरात ही स्थिती निर्माण झाली होती. यासंदर्भात लोकमतमधून वृत्त प्रकाशित झाल्यानंतर माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी याकडे लक्ष केंद्रित केले. त्यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी मांडत राज्यातील नुकसानग्रस्त पशुपालकांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी केली. अखेर राज्य शासनाने दखल घेत एप्रिलपासून दगावलेल्या पशुधनाच्या पालकांना नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यास १२ लाख ५० हजारांची तरतूद...लम्पीमुळे दगावलेल्या पशुधनाच्या नुकसानीपोटी अर्थसाहाय्य देण्यासाठी जिल्ह्यास १२ लाख ५४ हजार ८०६ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याअंतर्गत मयत ५९ पशुधनापोटी भरपाई देण्यात येणार आहे. लवकरच ही रक्कम नुकसानग्रस्त पशुपालकास दिली जाणार आहे. त्यामुळे हतबल झालेल्या पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.
आतापर्यंत ७ हजार पशुधनास संसर्ग...जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ९७३ पशुधनास लम्पी चर्मरोगाचा संसर्ग झाला होता. उपचारानंतर ६ हजार २०६ पशुधन बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ६७० पशुधन दगावले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी पहिल्या फेरीत २ लाख ५२ हजार ३१६ पशुधनावर लसीकरण करण्यात आले. आता दुसऱ्या फेरीत ९९ हजार १२५ पशुधनावर लसीकरण करण्यात आले आहे. सध्या ९७ पशुधनावर उपचार सुरू आहेत.
भरपाईसाठी प्रस्ताव घेणे सुरू...शासनाच्या आदेशाअभावी एप्रिलपासून नुकसानभरपाई देणे बंद होते. आता राज्य सरकारने अर्थसाहाय्याचे आदेश देण्याबरोबर साडेबारा लाखांचा निधीही उपलब्ध करून दिला आहे. सध्या ५९ पशुधनाच्या नुकसानीपोटी मदत देण्यात येणार आहे. तसेच नवीन प्रस्ताव स्वीकारण्यात येत आहेत.- डॉ. सूर्यकांत नागरगोजे, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन.