औसा : येथे १४ व्या वित्त आयोगातून बाजाराच्या विकासासाठी दोन कोटी ४ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे भाजीपाला बाजारात विक्रेत्यांसाठी उभारण्यात आलेल्या शेडमध्ये पशुधन बांधण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांना रस्त्यावरच भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे एमआयएमसह व्यापारी, शेतकऱ्यांनी शेडला हार बांधून गांधीगिरी आंदोलन केले.
औसा शहरातील किल्ला मैदानावर पालिकेच्या शेजारी दर रविवारी आठवडी बाजार भरतो. सुरुवातीपासूनच जागेचा अभाव, वाढते अतिक्रमण आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बाजाराची दुरवस्था आहे. बाजार परिसरात शेतकरी व व्यापाऱ्यांना बसण्यासाठी ओटे, त्यावर शेड, लहान शॉपिंग कॉम्प्लेक्ससह रस्ते बनविण्यात आले. ओटे तयार झाले तसेच शेड उभारून वर्षही उलटले. मात्र, नियोजनाअभावी आजही त्याचा वापर झालेला नाही. शेडचे पत्रे तुटले असून, रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तसेच शेडमध्ये पशुधन बांधण्यात येत असून, व्यापारी, शेतकऱ्यांना रस्त्यावर बसून भाजीपाला विक्री करावा लागत आहे. त्यामुळे एमआयएमचे मुजफ्फरअली इनामदार, माजी नगरसेवक सत्तार बागवान यांच्यासह शेतकरी, व्यापाऱ्यांनी ओट्यावर उभारलेल्या शेडला हार घालून गांधीगिरी आंदाेलन केले.
भाजीपाल्यासाठी दिवसभर उन्हात...बसायला सावली, पिण्याचे पाणी, शौचालयाच्या सुविधेचा अभाव असलेल्या बाजारात भाजीपाला विक्री करण्यासाठी ८ तास उन्हात तळपत बसावे लागते. औसा येथील बाजार जुना आहे. मात्र, येथे सुविधांचा अभाव असल्याचे वानवडा येथील शेतकरी पंडू सांगवे, व्यंकट कदम यांनी सांगितले. तसेच विक्रेते, शेतकऱ्यांना पालिकेकडून आले आहे असे सांगत २० रुपये शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे पालिका प्रशासन लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.