नव्या आदेशानुसार किराणा दुकान, रेशन दुकान, भाजीपाला, फळे, दूध, मेडिकल दुकाने, बांधकाम सामग्री, आर्थिक व्यवहार वगळता उर्वरित सर्व दुकाने ४ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची राज्यात अंमलबजावणी सुरू आहे; तसेच दर आठवड्याच्या शुक्रवारी रात्री ९ वा. पासून ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ५७ तासांचा कडक असा वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात हा लॉकडाऊन राहणार आहे. या वीकेंडमध्ये जिल्हाबंदी असून अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना जिल्हा व राज्य बंदी राहणार आहे. वीकेंड लॉकडाऊनमध्ये धार्मिक स्थळे सुरू राहणार असली तरी तिथे पुजारींना प्रवेश दिला जाणार आहे.
बीदर जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाची परिस्थिती गंभीर असून, खाटा मिळत नसल्यामुळे रुग्ण बीदर येथील शासकीय रुग्णालयासमोरील उघड्या जागेवर झोपलेले दिसून येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ७१८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात ११ हजार ४३९ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. यंदा दुसऱ्या लाटेत २३१ जणांचा मृत्यू झाला आहे.