लातूर : स्वस्त धान्य दुकानातून शासन धान्याबरोबर विविध वस्तूंचे वाटप सुरू करीत आहे. त्यामुळे दुकानदारांना यातून मिळणारे उत्पन्न तुटपुंजे आहे. परिणामी, मासिक किमान ५० हजार रुपये मानधन दुकानदारांना देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यातील जवळपास १ हजार १०३ स्वस्त धान्य दुकानदार बेमुदत संपात सहभागी झाले आहे. परिणामी, धान्य वितरणावर परिणाम झाला आहे.
रेशनवर स्वस्त आणि मोफत वस्तू देण्याच्या घोषणा शासनाकडून केल्या जात आहेत. वितरणाची जबाबदारी दुकानदारांवर टाकली जात आहे. अगोदरच तुटपुंजे कमिशन, पीओएस मशीनमध्ये होणारा सततचा बिघाड यामुळे दुकानदारांना डोकेदुखी झाली आहे. यातून त्रस्त झालेल्या दुकानदारांनी बेमुदत संप पुकारला असून, १ जानेवारीपासून लातूर जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार संपावर गेले आहेत. यात लातूर तालुका वगळता इतर ठिकाणी दुकाने कुलूपबंद आहेत. जोपर्यंत शासन निर्णय घेणार नाही, तोपर्यंत संप चालूच राहणार असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे. लातूर शहर व ग्रामीण भागातील २४८ दुकानदार मात्र या संपात सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे याठिकाणी धान्याचे वितरण सुरळीतपणे सुरू आहे.
काम जास्त; उत्पन्न कमी...स्वस्त धान्य दुकानदारांना मिळणारे कमिशन अत्यल्प आहे. वाढत असलेल्या योजनेमुळे काम वाढले तरी शासन कमिशन वाढवून देत नाही. अन्न सुरक्षा व मोफत धान्य वाटप, आनंदाचा शिधा सारख्या योजना वाढत असल्या तरी दुकानदारांना यातून मिळणारे उत्पन्न किरकोळ असल्याची ओरड आहे. संपात अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटना सहभागी झाली आहे.
गरजूंची अडवणूक नाही...स्वस्त धान्य दुकानदारांनी मागील महिन्यात २० ते ३० तारखेदरम्यान धान्याची उचल केली आहे. त्यांचा राज्यव्यापी संप असल्याने लातूर जिल्ह्यातील जवळपास ११०० दुकानदार संपात सहभागी आहेत. मात्र, जे गरजू लाभार्थी आहेत, त्यांना धान्य दिले जात आहे. त्यांचा संप मिटताच धान्याचे सुरळीतपणे वाटप होईल.-प्रियंका आयरे, जिल्हा पुरवठा अधिकारी.
मासिक ५० हजार मानधन द्यावे...शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना मासिक किमान ५० हजार रुपये मानधन द्यावे. कालबाह्य नियम बदलावेत, दुकानदारांना देण्यात आलेल्या टुजी मशीन बदलून फाेरजी देण्यात याव्यात. जोपर्यंत शासन मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे.-हंसराज जाधव, विभागीय अध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना.
स्वस्त धान्य दुकानदारांची संख्या...निलंगा- १९३अहमदपूर- १६५औसा- १९५चाकूर- १११देवणी- ६०जळकोट- ५७रेणापूर- ११३शिरूर अनंतपाळ- ५७उदगीर- १५२एकूण : ११०३