- हणमंत गायकवाड
लातूर : प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलेली काँग्रेस आणि सद्य:स्थितीत भाजपाकडे असलेल्या लातूर लोकसभा राखीव मतदारसंघात अर्ज दाखल करण्याची वेळ आली तरी दोघांनाही उमेदवार निश्चित करता आलेला नाही.
काँग्रेसकडे ५० पेक्षा अधिक जणांनी उमेदवारीची मागणी केली असली तरी त्यांना योग्य उमेदवार अद्याप मिळाला नाही अन् विद्यमान खासदार भाजपाचाच असताना त्यांनाही उमेदवारीवर शिक्कामोर्तब करता आलेले नाही. काँग्रेसकडे प्रारंभापासूनच उमेदवारी कोणाला, हा प्रश्न होता. मात्र अंतिम निर्णय झाला नाही. भाजपचे विद्यमान खा.डॉ. सुनील गायकवाड हे उमेदवार राहणार नाहीत, अशी व्यूहरचना पक्षातच आखली गेली. मोठे मताधिक्य मिळविलेल्या विद्यमान खासदारांना भाजपातील स्थानिकांनी डावलण्याचा जो डाव आखला, त्याने काँग्रेसजन सुखावले. परंतु काँग्रेसलाही लढत देईल असे नाव अखेरपर्यंत स्पष्ट करता आले नाही. काँग्रेसकडून डॉ. शिवाजी काळगे, पृथ्वीराज सिरसाट, भा.ई. नगराळे या तिघांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय, मच्छिंद्र कामत यांचेही नाव स्पर्धेत आले आहे. परंतु निर्णय होत नसल्याने संभ्रमावस्था आहे.
अशीच स्थिती सत्ताधारी पक्षाचीही असून, खा.डॉ. सुनील गायकवाड, आ. सुधाकर भालेराव ही नावे मागे टाकून सुधाकर शृंगारे यांचे नाव पुढे आणले आहे. लोकसभेतील कामकाज आणि वरिष्ठ स्तरावर समाधानकारक कामाची नोंद असली, तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांतील रोषामुळे विद्यमान खासदारांना तिकीट मिळणार नाही, असा अंदाज पक्षांतर्गत वर्तविला जात आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बूथ पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात एका गटाने विरोध दर्शविल्याने खासदारांना डावलले जाईल, याची कुणकुण लागली होती. दरम्यान, वंचित आघाडीने मात्र १५ दिवसांपूर्वी माजी शिक्षणाधिकारी राम गारकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
राजकीय आखाडा रंगणारकाँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोणी का असेना, राजकीय आखाडा रंगणार आहे तो पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख यांच्यात. काँग्रेसचा प्रदीर्घ काळ गड राहिलेला लातूर लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यातून मिळविण्यासाठी आमदार अमित देशमुख व्यूहरचना आखतील, तर पालकमंत्री संभाजी पाटील मतदारसंघावर आपलीच पकड मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहतील.