Lok Sabha Election 2019 : लातूरात काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडीमध्ये अटीतटीचा सामना होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 17:35 IST2019-03-30T17:34:46+5:302019-03-30T17:35:37+5:30
लातूर लोकसभा राखीव मतदारसंघात दहा उमेदवार अंतिमत: रिंगणात राहिले आहेत.

Lok Sabha Election 2019 : लातूरात काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडीमध्ये अटीतटीचा सामना होणार
लातूर : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी लातूर लोकसभा राखीव मतदारसंघात दहा उमेदवार अंतिमत: रिंगणात राहिले आहेत. काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडीमध्ये होणारी लढाई अटीतटीची होणार हे स्पष्ट झाले आहे.
एकूण १२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यातील दोघांनी माघार घेतली. आता दहा जणांपैकी काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत, भाजपचे सुधाकर शृंगारे आणि वंचित आघाडीचे राम गारकर यांच्यात लढत होईल. भाजपची उमेदवारी दाखल करताना झालेली एक सभा वगळता कोणीही थेट प्रचाराची रणधुमाळी सुरू केलेली नाही. दोन दिवसातील लग्नाचे मुहूर्त आटोपल्यानंतरच नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाहेर पडतील, असे दिसते.
सद्य:स्थितीत भाजप आणि काँग्रेसचा गाठीभेटींवर जोर आहे. बूथ रचना समोर ठेवून कार्यकर्त्यांची जमवाजमव केली जात आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारीचे वाटप सुरू आहे. एकंदर, रणधुमाळीची पूर्वतयारी शिगेला पोहोचली असली, तरी प्रत्यक्ष निवडणूक मैदान थंड आहे.
काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडी उमेदवाराबरोबरच बसपाचे सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अरुण सोनटक्के, बहुजन मुक्ती पार्टीचे दत्तू करंजीकर, स्वतंत्र भारत पक्षचे रुपेश शंके व अपक्ष रमेश कांबळे, मधुकर कांबळे, पपिता रणदिवे हे निवडणूक मैदानात उतरले आहेत.