लातूर/उस्मानाबाद - उस्मानाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे असली तरी काँग्रेसकडून शिवराज पाटील चाकूरकर यांनी लढावे, अशी मागणी अंतिम टप्प्यातही सुरू आहे. दरम्यान, सोमवारी रात्री राणा जगजितसिंह यांनी लातूर येथे येऊन चाकूरकरांची भेट घेतल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र, दोघांकडूनही ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले.
राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह यांनी तयारी सुरू केलेली आहे. परंतू जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यातही मराठवाड्यातील फेरबदलाची चर्चा संपलेली नाही. मंगळवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असूनही काँग्रेस, राष्ट्रवादीत उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेला नाही. उस्मानाबाद मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. शिवाय माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह हे प्रबळ दावेदार आहेत़ तसेव औरंगाबाद येथून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे उस्मानाबादची जागा काँग्रेसकडे घेतली जाईल, अशी चर्चा सुरू झाली होती. परंतू काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी औरंगाबादची जागा सोडण्याची तयारी दर्शविली नाही. एकीकडे हा तिढा कायम असताना लातूर, उस्मानाबादमधील काँग्रेस कार्यकर्ते चाकूरकरांचे नाव पुढे करीत आहेत. दरम्यान, सोमवारी रात्री राणा जगजितसिंह यांनी चाकूरकर यांची भेट घेतली. उमेदवार कोणीही असो एकमेकांना समर्थन द्यायचे, हा निर्धार पक्का असल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले आहे.