लातूर : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी चांगल्या आहेत. परंतु, देश चालविण्याची त्यांची कुवत नाही. चिठ्ठी वाचल्याशिवाय त्यांना भाषण येत नाही, अशी टीका करीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी लातुरात आयोजित सभेत ‘खिचडी पुराण’ सांगून कार्यकर्त्यांचे मनोरंजन केले.
दानवे म्हणाले, पुस्तक वाचून खिचडी होत नाही, तसे चिठ्ठी वाचून देश चालविता येत नाही. माझ्याच घरात पत्नीला स्वयंपाक येत नव्हता. त्यामुळे मी तिला दोन महिने माहेरी पाठवून स्वयंपाक शिकून परत ये म्हणालो. दोन महिन्यांनी ती आली. मी तिला खिचडी करायला सांगितले. तिने पुस्तक काढले. त्यात लिहिल्याप्रमाणे अडीचशे ग्रॅम तांदूळ, अडीचशे ग्रॅम डाळ, मीठ, हळद, मिरची टाकले. पातेले झाकून ठेवले. अर्धा तास वेळ दिला. उघडून पाहिले तर खिचडी शिजली नव्हती. कारण स्टोव्हच सुरू केला नव्हता, असे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. या कथेचे निरूपण करताना दानवे यांनी वाचून केल्या जाणाऱ्या भाषणाची खिल्ली उडविली.
नायडू, मायावती, बॅनर्जी, अब्दुल्ला यांचे तोंड खरकटे चंद्राबाबू नायडू, बसपा नेत्या मायावती, ममता बॅनर्जी, उमर अब्दुल्ला हे नेते एकेकाळी आमच्यासोबत होते. ते आमच्या पंक्तीत जेऊन गेले. त्यांचे तोंड अद्याप खरकटे आहे अन् तेच आमच्यावर जातीयवादाचा आरोप करतात, अशी टीका दानवेंनी केली.
दानवेंचे माध्यमांवर खापर पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले आणि त्या बदल्यात आपण त्यांचे ४०० अतिरेकी मारले, असे वादग्रस्त विधान केल्याने पुन्हा एकदा चर्चेत आलेले रावसाहेब दानवे म्हणाले, मी सैनिकांसंदर्भाने चुकीचा उल्लेख केलेला नाही. माध्यमांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला. चुकीची माहिती लोकांसमोर दिली, असे स्पष्ट करीत त्यांनी माध्यमांवर खापर फोडले.