- हणमंत गायकवाड
लातूर : भारतीय जनता पार्टीने अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या उमेदवाराचा चेहरा बदलला असून, विद्यमान खा.डॉ. सुनील गायकवाड यांना तिकीट नाकारले आहे. जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे हे भाजपाचे उमेदवार असतील. काँग्रेसने शनिवारी रात्री उमेदवारांची घोषणा केली असून मच्छिंद्र कामत यांचे नाव जाहीर करण्यात आले.
भाजपतर्फे सुधाकर शृंगारे यांच्या उमेदवारीचे पारडे जड करण्यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि लोकसभा मतदारसंघातील आमदारांचा मोलाचा वाटा आहे. खा. गायकवाड हे मलाच तिकीट मिळणार, असे वारंवार सांगत राहिले. त्यांचे प्रगतीपुस्तकही बरे होते. संसदीय कामकाज आणि सभागृहातील उपस्थितीत ते पुढे होते, असा त्यांचा दावा होता. अडीच लाखांच्या फरकाने ते विजयीही झाले होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांत नाराजीचा सूर उमटत होता. अमित शहा यांच्या दौऱ्यातच गायकवाड यांच्या उमेदवारीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
दरम्यान, उदगीरचे आ. सुधाकर भालेराव यांचे नावही काही काळ चर्चेत होते. दिल्ली दरबारात व नितीन गडकरी यांच्याकडून आपल्यालाच आशीर्वाद असल्याचा दावा शेवटपर्यंत गायकवाड करीत राहिले. त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियात संदेश फिरत असतानाच शृंगारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. मुंबईत कंत्राटदार असणारे शृंगारे आता पक्षाची मोट कशी पाठीशी ठेवतात आणि कसा प्रचार रंगतो, हे रंगपंचमीनंतर कळणार आहे. दुसरीकडे काँग्रेसतर्फे डॉ. शिवाजी काळगे, मच्छिंद्र कामत, पृथ्वीराज सिरसाट आणि संजय बनसोडे ही नावे चर्चेत होती. शनिवारी रात्री कामत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
कोण आहेत शृंगारे? सुधाकर शृंगारे हे मूळचे चाकूर तालुक्यातील घरणी गावचे आहेत. ते वडवळ नागनाथ जिल्हा परिषद गटातून निवडून आले. राजकारणात नवखे आहेत. मात्र, पालकमंत्री संभाजी निलंगेकर आणि लोकसभा मतदारसंघातील आमदारांचा त्यांना प्रारंभापासूनच पाठिंबा मिळाला आहे. त्यांनी उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयातून बी.ए. केले. शिक्षणानंतर रोजगारासाठी ते बंगळुरूला गेले. नंतर त्यांनी मुंबई येथे कंत्राट व्यवसायात जम बसविला.
उमेदवाराचे नाव चुकल्याने संभ्रमलोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारी घोषित करताना यादीमध्ये सुधाकर भालेराव शृंगारे, असे नमूद केले. शृंगारे यांच्या वडिलांचे नाव तुकाराम आहे. शिवाय, सुधाकर भालेराव हे उदगीरचे आमदार असून ते स्वत:ही इच्छुक होते. त्यामुळे यादी जाहीर झाल्यानंतर भालेराव की शृंगारे ही चर्चा काही वेळ रंगली; परंतु सुधाकर शृंगारे यांचेच नाव अंतिम असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.