उजनी : महावितरणच्या दुर्लक्षामुळे उजनीतील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत होता. तसेच काही ठिकाणी विद्युत तारांना झोळ पडला होता. डीपी अन्यत्र बदलणे आवश्यक होते. त्यासाठी ग्रामपंचायतीने सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर महावितरणने लक्ष देऊन आवश्यक ती सर्व दुरुस्ती केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
औसा तालुक्यातील उजनी हे बाजारपेठेचे गाव आहे. काही दिवसांपासून गावातील वीजपुरवठा सातत्याने अचानक बंद पडत होता. त्यामुळे गावातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. याशिवाय, काही ठिकाणचे खांब झुकले होते. परिणामी, शॉर्टसर्किट होऊन डीपी जळत होता. तसेच गावातील काही भागातील विद्युत तारांना झोळ पडला होता. त्यामुळे पावसाळ्यात धोका निर्माण झाला होता.
याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत होते. ग्राहकांनी तक्रारी करूनही त्याची फारशी दखल घेतली जात नव्हती. गावातील ही समस्या जाणून घेऊन ग्रामपंचायतीने महावितरणकडे जुने खांब बदलण्यात यावेत, विद्युत तारा बदलाव्यात. वीजतारांतील झोळ काढावी, आवश्यक तिथे स्वीच बसवावा, गावातील डीपी अन्यत्र बसवावी, अशी मागणी करीत त्यासाठी विद्यमान उपसरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती योगिराज पाटील यांनी पाठपुरावा केला.
त्यामुळे महावितरणचे निलंगा येथील कार्यकारी अभियंता विष्णू ढाकणे व औसा येथील उपकार्यकारी अभियंता गणेश जाधव यांनी दखल घेत स्वत: उपस्थित राहून पाहणी केली. तसेच संबंधित गुत्तेदारास तत्काळ काम सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी गावातील नादुरुस्त डीपींची दुरुस्ती करण्यात आली. तसेच अन्य कामेही पूर्ण करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य...
गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या अडचणी ग्रामपंचायतीत मांडाव्यात. गावातील नागरिकांना सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.
- योगिराज पाटील, उपसरपंच.