किल्लारी (जि. लातूर) : परिसरातील जाऊ पाटीनजीक निलंगा शहराकडे जाणाऱ्या टेम्पोला अडवून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी चालकाच्या खिशातील माेबाईल हिसकावत पळ काढल्याची घटना लातूर-बिदर महामार्गावर घडली. याबाबत किल्लारी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाेलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी विनोद कांतराव ढाले (रा. गव्हाण, ता. निलंगा) हे टेम्पो (एम.एच. १४ ए.एच. २३९८) घेऊन निलंगा शहराकडे साेमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास निघाले हाेते. दरम्यान, अनोळखी तिघा तरुणांनी (एम.एच. १४ जे.बी. ४६९२) या क्रमांकाच्या दुचाकीवरून आले. त्यांनी आपली दुचाकी टेम्पाेसमाेर आडवी लावली. यावेळी तिघांनी टेम्पाे थांबताच फिर्यादी चालक विनोद ढाले यांच्या खिशातील १५ हजारांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावत पळ काढला.
याबाबत किल्लारी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. मिळालेल्या माहितीच्या आधारे निलंगा तालुक्यातील नंणद येथून आजय धनराज कांबळे (२५), आप्पाराव विश्वास लादे (३१) आणि बिरू प्रदीप भोजने (२५) यांना दुचाकीसह अटक केली. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक सुनील गायकवाड, पाेलीस उपनिरीक्षक रणजित काटवठे, कर्मचारी सोनवणे, किसन मरडे, चालक मुळे यांच्या पथकाने केली आहे.