लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : राज्यातील साखर कारखानदारीत काेट्यवधींचे घाेटाळे झाले असून, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर व उदगीर तालुक्यातील ‘ते’ कारखानेही चाैकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत, असा आराेप माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शुक्रवारी केला.
काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पैशावर उभे असलेले सहकारी साखर कारखाने कवडीमाेल भावाने खरेदी केलेले आहेत. आता हे कारखाने ईडीच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे या कारखान्यांना चाप लागणार आहे, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांचे शेअर्स घेऊन सहकारी साखर कारखाने उभे केले व नंतर ते दिवाळखाेरीत काढले. त्यानंतर कवडीमाेल किमतीने विकत घेतले. सहकाराच्या नावावर स्वाहाकार करुन शेतकऱ्यांना लुबाडण्याचे पाप उघडे पडेल. लातूर जिल्ह्यात अहमदपूर आणि उदगीर तालुक्यात चुकीच्या पद्धतीने कारखाने खरेदी केले आहेत. त्यामध्ये काॅंग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उघडे पडतील. कारखान्याच्या माध्यमातून स्वत:ची समृद्धी आणि विकास केल्याचा आराेपही माजी मंत्री निलंगेकर यांनी केला आहे.