लातूर : शेतकऱ्यांना शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याविषयीची माहिती मिळावी म्हणून विदेश अभ्यास दौरा आयोजित करण्यात येतो. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लॉटरी पध्दतीने निवड झाली आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना विदेशाकडे विमान कधी उडणार याची उत्सुकता लागली आहे.
शेतकऱ्यांचे ज्ञान व क्षमता उंचावण्यासाठी परदेश अभ्यास दौरा आयोजित करण्यात येतो. त्यातून विदेशातील शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती मिळते. विदेशातील आधुनिक शेतीची प्रत्यक्षात पाहणी करण्याची संधी उपलब्ध हाेते. या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार एकूण २१ प्रस्ताव दाखल झाले होते. त्याची छाननी होऊन लॉटरी पध्दतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. सुरुवातीच्या प्रथम तिघांना विदेश दौऱ्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.
१२ वी पात्रतेच्या अटीने उडाला गोंधळ...देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी किमान १२ वी पात्रता धारक असणे अपेक्षित आहे. दरम्यान, दाखल प्रस्तावांपैकी एका इच्छुक शेतकऱ्याचे शिक्षण हे दहावी आणि कृषी विषयाचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम तर दुसऱ्या शेतकऱ्याचे शिक्षण दहावी आणि डिप्लोमा झाला होता. त्यामुळे हे दोन्ही प्रस्ताव वगळण्यास सुरुवात झाली. हे पाहून त्या दोन इच्छुक शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदविला. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमावर बोट ठेवत १२ वी उत्तीर्णचे गुणपत्रक सादर करण्यास सांगितले. तेव्हा या शेतकऱ्यांनी आपण केलेला डिप्लोमा हा समकक्ष असल्याचे सांगितले. अखेर कृषी अधिकाऱ्यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले. तेव्हा वरिष्ठांनी त्या दोन शेतकऱ्यांना संधी देण्याच्या सूचना केल्या.
चिठ्ठी काढून झाली निवड...२१ पैकी ५ प्रस्ताव अपूर्ण असल्याने छाननीत ते अवैध ठरले. त्यामुळे उर्वरित १६ प्रस्तावांतून शेतकऱ्यांची चिठ्ठी काढून निवड करण्यात आली. ही निवड अत्यंत पारदर्शकपणे पार पडली आहे.- महेश क्षीरसागर, कृषी उपसंचालक.
पहिल्या तीन शेतकऱ्यांना प्राधान्य...लॉटरीत प्रथम नाव सतीश पवार (रा. गरसुळी, ता. रेणापूर), दुसरे रमेश पटवारी (रा. हैबतपूर, ता. उदगीर) आणि तिसरे नाव गंगाधर सिंदाळकर (रा. नळेगाव, ता. चाकूर) यांचे निघाले. चौथा क्रमांक यशपाल घोडके (रा. मोरवड, ता. रेणापूर), पाचव्या स्थानी लिंबराज थेटे (रा. तगरखेडा, ता. निलंगा) अशी नावे निघाली आहेत.