चाकूर : चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना १० रुपयांत मिळणारी आरोग्य सेवा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे बंद झाली आहे. येथील आरोग्य सेवेचा भार नळेगाव, चापोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर सोपविण्यात आला आहे. परिणामी, गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी ४०० ते ५०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होत आहे.
चाकुरात ग्रामीण रुग्णालय आहे. कोरोना रुग्णांसाठी कृषी महाविद्यालयात इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयातील बाळंतपणाची सुविधा नळेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर तर बाह्य रुग्ण, आंतर रुग्ण व अन्य आरोग्य सेवांचा भार चापोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रावर सोपविण्यात आला. मात्र, सदरील दोन्ही ठिकाणी सुविधा वाढविण्यात आल्या नाहीत. अगोदरच सुविधांचा अभाव असताना प्रशासनाने ग्रामीण रुग्णालयातील सुविधा अन्यत्र हलविल्या आणि येथे डेडिकेटेड हेल्थ रुग्णालय सुरू करण्यात आले. परिणामी, शहरासह परिसरातील गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी चापोलीला जाणे परवडणारे नाही. त्यातच बसेस सुरु नाहीत. खासगी वाहनासाठी २०० ते ३०० रुपये मोजावे लागतात. परिणामी, रुग्णांवर खासगी रुग्णालयात जाण्याशिवाय पर्याय शिल्लक नाही. रुग्णसंख्या वाढल्याने शहरातील काही डॉक्टरांनी तपासणी शुल्कात वाढ केली आहे. मेडिकल दुकानवर औषधी रोखीने घ्यावी लागतात. त्यामुळे एका रुग्णाला किमान ४०० ते ५०० रुपये मोजावे लागत आहेत.
ग्रामीण रुग्णालयात दररोज १२५ ते १६० रुग्णांची नोंद असते. याशिवाय, बाळंतपणासाठीच्या मातांची संख्या वेगळीच. रुग्णांना केवळ १० रुपयांच्या नोंदणी शुल्कात तपासणीसह औषधी मिळत होती. वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे गोरगरिबांच्या हाताला काम नाही. त्यामुळे उत्पन्न नसल्याने आजारावरील खर्च पेलणे कठीण झाले आहे.
ग्रामीण रुग्णालयात दररोज उपचारासाठी रुग्ण येतात. त्यांना चापोलीला जाण्यास सांगितले जाते. तेव्हा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. दीपक लांडे यांच्याकडे रुग्ण चौकशी करतात तेव्हा तहसीलदारांचा आदेश असल्याचे ते सांगतात. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांतून संताप व्यक्त होत आहे.
लवकरच सुविधा उपलब्ध करू...
ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधा बंद करण्यापूर्वी त्याचा विचार करायला हवा होता. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून लवकरच पूर्वीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ.
- आमदार बाबासाहेब पाटील
सुविधा सुरू होतील...
कृषी महाविद्यालयाच्या कोरोना सेंटरमध्ये डेडिकेटेड हेल्थ सेंटर हलविण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा बंद असल्याने रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. परंतु ग्रामीण रुग्णालयातील सुविधा पूर्ववत सुरु होतील.
- डॉ. अर्चना पंडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी.
पूर्ववत सेवेसाठी प्रयत्न...
डेडिकेटेड हेल्थ सेंटरमध्ये २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांना सुटी झाल्यावर ग्रामीण रुग्णालयात पूर्वीच्या सर्व आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
- डॉ. दीपक लांडे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय.
जगणे कठीण झाले...
दीड महिन्यापासून ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा बंद आहे. कोरोनामुळे गोरगरिबांना जगणे कठीण झाले असताना उपचारासाठी ४०० ते ५०० रुपये मोजावे लागत आहेत.
- रफिक कोतवाल, नागरिक.