लातूर : कोरोना काळत माणसावर निर्बंध होते. आता पशुधनांमध्ये चर्म रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून सद्यस्थितीत ७८५ पशुधन या आजाराने त्रस्त आहेत. बैलपोळा सण अगदी तोंडावर आला असताना या रोगाने डोके वर काढले आहे. त्यामुळे हा सण साध्या पद्धतीने घरगुती साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. एकूणच मिरवणुका आणि एका ठिकाणी पशुधन एकत्र करण्यास प्रशासनाची मनाई आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये ४९४२ पशुधनांना लम्पी संसर्गजन्य आजाराची लागण झाली होती. त्यापैकी ३६८७ पशुधन दुरुस्त झाले आहेत. तर ४७० पशुधनाचा जीव या आजारामुळे गेला आहे. सद्यस्थितीत ७८५ पशुधनावर उपचार सुरू आहेत. फक्त गोवंशवर्गीय पशुधनामध्ये या आजाराची लागण आहे. म्हैस वर्गात या आजाराची लागण नाही. त्यामुळे प्रशासनाने गोवंशवर्गीय जनावरांचा बाजार बंद केला आहे. शेळी आणि म्हैस वर्गातीलच पशुधनाची खरेदी-विक्री सुरू आहे. गाय, बैल वर्गाची खरेदी-विक्री बंद आहे.
दोन लाख ४७ हजार ७६४ पशुधनाचे लसीकरण पूर्ण....लम्पी अर्थात चर्मरोग आजाराला रोखण्यासाठी पशुधन संवर्धन विभागाने जिल्ह्यात जोरात लसीकरणाची मोहीम राबविली आहे. आतापर्यंत दोन लाख ४७ हजार ७६४ पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. १००% लसीकरण करण्यात आले आहे.
आजाराचा प्रभाव कमी करण्यासाठी निर्बंध...लातूर जिल्ह्यात लातूर, रेणापूर, मुरुड, हळी, कासार शिरसी आदी बारा गावांत जनावरांचा बाजार भरतो. परंतु चर्मरोग आजाराची तीव्रता लक्षात घेता जिल्ह्यातील बाराही ठिकाणच्या बाजारामध्ये गोवर्गीय पशुधनाची खरेदी-विक्री थांबवलेली आहे. बाजार बंद केले आहेत. पोळ्याच्या सणामध्येही पशुधनाला एकत्र आणू नका, व्यक्तिगत पातळीवर सण साजरा करा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
४७० जनावरांचा घेतला लम्पीने बळी...।एप्रिलपासून ४९४२ आजार झाला. त्यापैकी ३६८७ जनावरे दुरुस्त झाली आहेत. तर ४७० जनावरे या आजाराने मृत्यू पावले आहेत. वेळेत उपचार केल्यास आजार नष्ट होतो.
कोरोनात होते माणसांवर तर आता पशुधनाला निर्बंध....कोरोना या आजाराची लागण माणसांमध्ये होत होती. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे माणसांना एकत्र येण्यावर निर्बंध होते. आता जनावरातला लम्पी अर्थात चर्मरोग संसर्गजन्य आहे. कीटक चावल्यामुळे हा आजार होतो. संसर्ग पसरू नये म्हणून जनावरांमध्येही विलगीकरण करण्यात आले आहे. ज्या गाय, बैलाला या आजाराची लागण झालेली आहे. त्या पशुधनाला विलगीकरणात ठेवले जात आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक आयुक्त डॉ. एस. पी. नागरगोजे यांनी दिली.