लातूर : साेलार प्राेजेक्टसाठी तांत्रिक याेग्यता देण्याच्या कामासाठी २२ हजारांची लाच स्वीकारताना महावितरणाच्या एका सहायक अभियंत्याला एसीबीने रंगेहाथ पकडले. सलग दुसऱ्या दिवशी दुसरा मासा एसीबीच्या गळाला लागला आहे. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, लातूरमध्ये साेलार इन्स्टाॅलेशनचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने आपल्या ग्राहकाचे काम हाती घेतले हाेते. त्यांनी ग्राहकाच्या प्राेजेक्टसाठी तांत्रिक याेग्यता (टेक्निकल फिजिबिलिटी) देण्याच्या कामासाठी महावितरण विभागाचा सहायक अभियंता गाेविंद तुकाराम सर्जे (वय ४६, रा. लातूर) याच्याकडे प्रस्ताव दाखल केला. मात्र, या कामासाठी अभियंत्याने तक्रारदाराकडे ३० हजारांच्या लाचेची मागणी केली. अखेर तडजाेडीअंती २२ हजारांची लाच देण्याचे ठरले.
याबाबत लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्रस्त झालेल्या ३३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालय परिसरात बुधवारी सापळा लावला. यावेळी सहायक अभियंता गाेविंद सर्जे याला पंचांसमक्ष २२ हजारांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. त्याला अटक करण्यात आली असल्याचे एसीबीचे पाेलिस उपअधीक्षक पंडित रेजितवाड यांनी सांगितले. या प्रकरणी गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पथकाने केली तीनदा पडताळणी...
लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर लाचेची मागणीची १०, १४ आणि १५ मार्च राेजी अशी तीन वेळा पथकाने पडताळणी केली. दरम्यान, बुधवारी सापळा लाावण्यात आला. यात सहायक अभियंता गाेविंद सर्जे हा लाच स्वीकारताना अलगदपणे अडकला. मंगळवारी डायटचा प्राचार्य तर बुधवारी महावितरणचा अभियंता एसीबीच्या गळाला लागला आहे.