- बालाजी कटकेरेणापूर (लातूर ) : पीकविमा भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत़ दरम्यान, महा- ई- सेवा केंद्र आणि आपले सरकारचे दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन झाल्याने शेतकऱ्यांना पीकविमा भरता येईनासा झाला आहे तर शहरातील दोन राष्ट्रीयकृत बँका बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा पीकविमा भरुन घेण्यास नकार देत आहेत़ त्यामुळे अनेक बिगर कर्जदार शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे़
रेणापूर शहरात महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक आॅफ इंडिया, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकांसह लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे़ यातील महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि बँक आॅफ इंडिया या दोन बँका वगळता अन्य दोन्ही राष्ट्रीयकृत बँकांकडून बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा पीकविमा भरुन घेत नाहीत़ याउलट महा- ई- सेवा केंद्र आणि आपले सरकारवर आॅनलाईन पीकविमा भरा, असा सल्ला देत आहेत़ आमच्याकडे पुरेसी यंत्रणा नसल्याचे सांगून हात वर करीत आहेत़
त्यातच महा-ई- सेवा केंद्र आणि आपले सरकारचे दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन झाले आहे़ त्यामुळे बिगर कर्जदार शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे़ पीकविमा भरण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक असल्याने पीकविमा कुठे भरावा, असा सवाल बिगर कर्जदार शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे़ त्यामुळे शासनाने पीकविम्यासाठी मुदतवाढ द्यावी तसेच सर्व बँकांनी विमा भरुन घ्यावा, अशी मागणी होत आहे़
सोसायटीचे दीड हजार थकबाकीदाऱ़़रेणापूर सेवा सहकारी सोसायटीचे १ हजार ५०० शेतकरी थकबाकीदार आहेत़ मात्र या सोसायटीची दत्तक बँक थकबाकीदार शेतकऱ्यांचा पीकविमा भरुन घेत नाही़ या शेतकऱ्यांनी आॅनलाईन पीकविमा भरावा, असा सल्ला देत आहे़ सोसायटीचे सभासद असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यासाठी सोसायटी प्रशासनाकडून कोणतेही व्यवस्था करण्यात आली नसल्याने हे दीड हजार शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत़
सोसायटीस परवडणारे नाही़सोसायटीचे चेअरमन देविदास कातळे म्हणाले, या शेतकऱ्यांनी पीकविमा भरावा, यासाठी सोसायटीने व्यवस्था करणे अवघड आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी आॅनलाईन पीकविमा भरावा, असे म्हणाले़
पुरेशा यंत्रणेचा अभावस्टेट बँक आॅफ इंडियाचे शाखाधिकारी दिनेश मोहरिया म्हणाले, बँकेकडे मनुष्यबळाची पुरेशी यंत्रणा नाही़ त्यामुळे बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा पीकविमा घेतला जात नाही़ यंत्रणा उपलब्ध झाल्यानंतर पीकविमा घेतला जाईल, असे सांगितले़ दररोजचे व्यवहार तसेच पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे व कर्जदारांची संख्या जास्त असल्याने बिगर कर्जदारांचा पीकविमा घेतला जात नाही़ त्यांचाही पीकविमा लवकरच भरुन घेतला जाईल, असे सेंट्रल बँकेचे मुख्य प्रबंधक उल्हास शिवदेव यांनी सांगितले़