लातूर : औसा तालुक्यातील शिंदाळा (लो.) येथील एका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने शुक्रवारी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, वीजनिर्मिती करणाऱ्या महाजनको कंपनीच्या धोरणामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे.
रावसाहेब शिवराम घोडके ( ८५, रा. शिंदाळा ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, मृत्यूपूर्वी घोडके यांनी चिट्ठी लिहिलं असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र यासंबंधी पोलिसांकडून माहिती मिळाली नाही. औसा तालुक्यातील शिंदाळा (लो.) येथे नियोजित भेल व महाजनकोच्या वायू विद्युत प्रकल्पासाठी काही शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या होत्या. त्यात रावसाहेब घोडके यांचीही ५ हेक्टर ७१ आर एवढी जमीन जवळपास १० ते १२ वर्षांपूर्वी संपादित झाली होती.
जमिनी संपादित करतेवेळी प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आले होते. मात्र गेल्या दहा वर्षांपासून वायू विद्युत प्रकल्प झालाच नाही. उलट त्याचे रूपांतर सौर ऊर्जा प्रकल्पात झाले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रकल्प ठिकाणी महाजनको कंपनीविरोधात प्रकल्पग्रस्त शेतकरी सातत्याने आंदोलन करत आहेत. मात्र महाजनकोकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून रावसाहेब घोडके यांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. दरम्यान, किशोर घोडके यांच्या फिर्यादीवरून भादा पोलिसांत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.