"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 12:27 AM2024-11-14T00:27:06+5:302024-11-14T00:31:07+5:30

राज्यातील ईडी कारवायांवरुन बोलताना राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि भाजपवर टीका केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Talking about ED action in the state Raj Thackeray has criticized Congress and BJP | "आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. आपल्या प्रचारसभांमधून राज ठाकरे हे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष करत आहेत. तसेच आपण भूमिका आपल्या स्वार्थासाठी बदलली नसल्याचेही राज ठाकरे सांगत आहेत. अशातच आता राज्यातल्या गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवायांवरुन राज ठाकरे यांनी आपले मत मांडले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या काळातही अशाच ईडी कारवाया सुरु होत्या असं म्हटलं आहे.

लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबतही भाष्य केलं आहे. तसेच काँग्रेसच्या काळात दिवंगत उद्योगपती रतन टाटांनाही चौकशीसाठी नेण्यात आलं होतं असंही राज ठाकरे म्हणाले.

"मला ईडी कारवायांचा काहीही फरक पडत नाही. ज्यांच्यावर कारवाई झाले ते अडचणीतच होते. मनमोहन सिंग यांचे ज्यावेळी सरकार होतं त्यावेळीही ईडी कारवाया होत होत्या. रतन टाटांना चौकशीसाठी नेण्यात आलं होतं. आपण काय करतो हे राज्यकर्त्यांनी पाहून ठेवायला हवं. ज्यावेळी विरोधी पक्षाचे सरकार येतं तेव्हा ते दाम दुपटीने करतात, असं राज ठाकरेंनी म्हटलं.

"भाजपसोबत गेल्यावर सगळं माफ होतं असा समज झाला आहे ही अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे. दुसऱ्याचा असतो तो वाईट आणि आपल्याकडे आला की चांगला याला काय अर्थ आहे. १० दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी सांगतात की ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केलेल्यांना आत टाकलं पाहिजे. आतं टाकलं पाहिजे म्हणजे पक्षात टाकलं पाहिजे हे लोकांना कळलं नाही. लोकांना वाटलं तुरुंगात टाकलं पाहिजे नंतर लक्षात आलं की आतमध्ये पक्षामध्ये टाकलं पाहिजे. ते थेट उपमुख्यमंत्रीच झाले," अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरेंनी केली.
 
यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या भूमिका बदलण्या बाबतच्या आरोपांवरही भाष्य केलं. "उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले तेव्हा त्यांना का नाही विचारलं की भूमिका का बदलली? शरद पवारांचे आतापर्यंतचे राजकारण पाहता भूमिका लाजायला लागली आहे. भाजपने कित्येक राज्यांमध्ये किती वेळा भूमिका बदलली आहे. माझी भूमिका ही स्वार्थासाठी नव्हती. मी चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणतोय. माझ्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रीपद घाला यासाठी माझी भूमिका नव्हती. मी नरेंद्र मोदींबद्दल जे बोललो ते त्यांच्या समोर देखील बोललो. माझ्या स्वार्थासाठी मी लोकांच्या मतांशी प्रतारण केली नाही, असं स्पष्टीकरण राज ठाकरेंनी दिलं.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Talking about ED action in the state Raj Thackeray has criticized Congress and BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.