Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. प्रचारतोफा थंडावल्या आहेत. आता मतदानादिवशी जनतेचा कौल कोणाला मिळणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी, अभिनेते रितेश देशमुख यांनी बंधू अमित देशमुख यांच्यासाठी प्रचारसभेत आपल्या लय भारी स्टाइलने भाषण केले. अमित देशमुख यांना निवडून देण्याचे आवाहन रितेश देशमुख यांनी यावेळी केले.
अमित देशमुख लातूर शहर मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणूक रिंगणात आहेत. अमित देशमुख यांच्या सांगता सभेसाठी त्यांचे बंधू आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी आवर्जून उपस्थिती लावली. यापूर्वी रितेश देशमुख यांनी केलेले भाषण चांगलेच गाजले होते. सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे सांगता सभेचे भाषणही तुफान गाजत असल्याचे सांगितले जात आहे.
लातूर शहराचा एकच हक्काचा बिग बॉस, ते म्हणजे अमित भैय्या
'लातूर शहराचा एकच हक्काचा बिग बॉस, ते म्हणजे अमित भैय्या', असा नारा रितेश देशमुख यांनी दिला. अमित देशमुख यांच्या सभेतही रितेशने विरोधी उमेदवाराचं नाव न घेता टीकास्त्र सोडले. रितेशच्या जबरदस्त डॉयलॉग बाजीने उपस्थितांचे याही वेळेस लक्ष वेधून घेतले. 'हे लातूर आहे पिल्लू, लातूरचा इंगा अजून बघितला नाही लोकांनी..', 'आपल्याला आपला हाथ भारी... दुसऱ्याला आपली लाथ भारी.. येत्या 23 तारखेला च्यामायला आपली लीडच लयं भारी', 'आपला उमेदवार एक नंबर, लिस्टमध्ये नाव एक नंबर आणि महाराष्ट्रामध्ये लीडपण एक नंबर लागली पाहिजे', अशी जोरदार डायलॉगबाजी रितेश देशमुख यांनी केली.
दरम्यान, युवकांची साथ ज्याला असते, त्याचा विजय निश्चित असतो, हे येत्या २० तारखेला तुम्ही करुन दाखवा. १५ वर्ष तुम्ही लातूरकर म्हणून प्रामाणिकपणे स्वप्न पाहिली आहेत, त्याला आता फळे येणार आहेत. अमित भैय्याकडून फक्त लातूरच्या नाही तर महाराष्ट्राच्या अपेक्षा आहेत. ते लातूरचेच नाही तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत, अशी लातूरकर म्हणून माझी इच्छा आहेच. तुमचीही असावी. जसे साहेबांनी प्रामाणिकपणे काम केले, तसेच अमित भैय्याही करत आहेत आणि करत राहतील, असा विश्वास रितेश देशमुख यांनी बंधू अमित देशमुख यांच्यासाठी व्यक्त केला.