लातूर - औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लातूरसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. हॉटेल, टपरी, शाळा-महाविद्यालये बंद होती. एस.टी.ही रस्त्यावरून धावली नाही. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गटा-गटाने मोटारसायकलवर फिरून बंदचे आवाहन करीत होते. दरम्यान, शिवाजी चौकात एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. औसा येथे पंढरपूरहून आलेल्या एका बसवर दगडफेक झाली असून, सिरसल येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जळकोट तालुक्यातील घोणसी येथेही रास्ता रोको आंदोलनादरम्यान एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. उदगीर येथे तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी दिवसभर ठिय्या आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. रेणापूर येथील पिंपळफाटा, खरोळा येथे आंदोलनकर्त्यांनी काही वेळ रास्ता रोको केला. लातूर शहरातील शिवाजी चौकात अमोल जगताप या कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. तसेच शहरात एक रुग्णालय, एक हॉटेल आणि दोन व्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक झाली. शिवाय, प्रवासी वाहतूक करणाºया चार वाहनांवरही औसा रोड, रेणापूर नाका आणि विवेकानंद चौक परिसरात दगडफेक झाली. शिक्षण उपसंचालकांना घेराव... ५० टक्के शैक्षणिक सवलतींचा शासन अध्यादेश दाखवा, या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी शिक्षण उपसंचालकांना घेराव घातला. दरम्यान, शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांनी असा कोणताही शासन अध्यादेश नसल्याचे आंदोलकांना सांगितले व त्याची लेखीही दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. एकही बस धावली नाही... लातूर, उदगीर, निलंगा, अहमदपूर आणि औसा आगारांतून मंगळवारी एकही बस धावली नाही. सकाळी ७ वाजेपासून बंद आंदोलनाला सुरुवात झाल्याने एस.टी. प्रशासनाने बस न सोडण्याचा निर्णय घेतला होता. सायंकाळी ६ वाजेपर्यंत बसेस बंद होत्या.
लातुरात एकाने पेट्रोल ओतून घेतले, शहरासह जिल्ह्यात कडकडीत बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 7:16 PM