लातूर / उस्मानाबाद : आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी पुकारलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला लातूर, उस्मानाबादेतील आंदोलनकर्त्यांनी सकारात्मक उपक्रमाची जोड दिली आहे़ ‘नको हत्या, नको आत्महत्या; करु रक्तदान, देऊ जीवदान’ असा घोष करीत दोन्ही ठिकाणी आयोजित रक्तदान शिबीरात पहिल्या तासाभरातच ३५० हून अधिक आंदोलकांनी रक्तदान केले़.
उस्मानाबाद जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चासोबतच मुस्लिम समाजानेही बंद पुकारला आहे़ त्यास जिल्हाभरात जोरदार प्रतिसाद मिळाला आहे़ जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत़ त्यामुळे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले़ एसटीच्या सर्वच आगारांनी आज एकही बस रस्त्यावर सोडली नाही़ त्यामुळे वाहतूकही गोठली आहे.सोलापूर-धुळे महामार्गावर ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे़ टायर जाळून व मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत आंदोलनकर्त्यांनी निषेध नोंदविला.
दरम्यान, उस्मानाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे़ आंदोलनकर्त्यांनी या शिबीरास जोरदार प्रतिसाद दिला़ पहिल्या तासाभरातच उस्मानाबादेत दीडशेहून अधिक बाटल्यांचे रक्तसंकलन झाले होते़ दुपारपर्यंत हा आकडा अडीचशे पुढे गेला़ अजूनही आंदोलनकर्ते युवक रक्तदानासाठी रांगा लावून उभे आहेत़ यात मुस्लिम समाजातील तरुणांनीही सहभाग घेतला आहे.
लातुरातही पीव्हीआर चौकात आंदोलनकर्त्यांनी रक्तदान शिबीर सुरु केले आहे़ येथेही पहिल्या तासाभरात शंभरहून अधिक बाटल्या संकलित झाल्या होत्या़ दोन्ही जिल्ह्यात दुपारपर्यंत चारशेपेक्षा अधिक बाटल्यांचे रक्तसंकलन झाले आहे़ इच्छुकांनी रक्तदानासाठी आंदोलनस्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे़