Maharashtra Election 2019: मेकअप कितीही केला तरी चेहरा लपवू शकत नाही; रितेश देशमुखांचा मोदींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 07:25 PM2019-10-03T19:25:55+5:302019-10-03T19:27:28+5:30
लातूर शहर विधानसभा निवडणूक 2019 - यावेळी अभिनेते आणि विलासरावांचे चिरंजीव रितेश देशमुख यांनी भावांच्या प्रचारासाठी रणांगणात उतरल्याचं पाहायला मिळालं.
लातूर - विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघातून यावेळी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित आणि धीरज देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज त्यांच्या उमेदवारी अर्ज भरताना हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली. यावेळी अभिनेते आणि विलासरावांचे चिरंजीव रितेश देशमुख यांनी भावांच्या प्रचारासाठी रणांगणात उतरल्याचं पाहायला मिळालं.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झालेल्या सभेत बोलताना रितेश देशमुख म्हणाले की, कठीण प्रसंग आहे, तुम्ही उभं राहणार की नाही, असं मला एकाने विचारलं तेव्हा मी सांगितलं मी लातूरचा आहे अडचणीचा काळ असला म्हणून काय झालं? आम्ही सहज कोणतीही गोष्ट घेत नाही. मध्यंतरी एक बातमी अशीही आली की मला माहिम विधानसभेतून तिकीट देण्यात येणार आहे. पण मी लातूरचा आहे, मी मराठवाड्याचा आहे, माझा जन्म इथला, माझा शेवटही इथचं होणार असं रितेश यांनी सांगितल्यावर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.
तसेच कार्यकर्त्यांची गर्दी पाहून ही तर विजयाची सभा आहे. साहेबांना मतदान करता आलं नाही मात्र भैय्यांना 21 तारखेला मतदान करणार हा नवीन मतदाराचा विश्वास आहे. पुढील काळात आता फेकाफेकी सुरु होणार आहे, विचित्र फूल दिसेल, मग डिलेट करा. मेकअप कितीही चांगला असला तरी तो खरा चेहरा लपवू शकत नाही, तुमचा खरा चेहरा लोकांसमोर येणारच. सत्ताधाऱ्यांनो, आता तुम्ही काळजी करा अशा शब्दात भाजपा-शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, एवढी गर्दी पाहून विरोधकांनी उमेदवारच जाहीर केला नाही. लातूर शहर आणि ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या जागा मताधिक्यांनी निवडून आणा, किती मताधिक्य मिळेल अशी स्पर्धा अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्यात लागली पाहिजे असं सांगत रितेश देशमुख यांनी लोक ईट का जवाब पत्थर से देते है, पर हम पत्थर का जवाब चट्टान से देंगे, और वो चट्टान है हवा का रुख भी बदल देंगे अशा शब्दात शायरी सुनावली.