लातूर : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात आता ७९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत़ ४१ जणांनी माघार घेतली. यात उदगीरचे विद्यमान आ़ सुधाकर भालेराव, औशातून माजी आ़ दिनकर माने, लातूर ग्रामीणमधून भाजपचे रमेश कराड यांचा समावेश आहे़
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात १० जणांनी माघार घेतली असून, १५ जण रिंगणात आहेत़ लातूर शहर विधानसभा मतदारसंघात तिघांनी माघार घेतली असून, १९ जण रिंगणात आहेत़ अहमदपूर विधानसभा मतदारसंघात ९ जण रिंगणात असून, चार जणांनी माघार घेतली आहे़ उदगीर विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात आहेत़ तर अखेरच्या दिवशी सोमवारी ८ जणांनी माघार घेतली आहे़ निलंगा विधानसभा मतदारसंघात सहा जणांनी माघार घेतली असून, १० जण लढत देत आहेत़ तसेच औसा विधानसभा मतदारसंघात १० जणांनी माघार घेतली असून, १४ उमेदवार रिंगणात आहेत़ लातूर जिल्ह्यात प्रामुख्याने लातूर ग्रामीण, उदगीर, अहमदपूर आणि औसा विधानसभा मतदारसंघात भाजप-सेनेच्या इच्छुकांनी बंडखोरी केली होती़
अहमदपूर, औशातील सामना बहुरंगी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी माने यांची मनधरणी केल्याने त्यांनी उमेदवारी मागे घेतली़ परंतु, भाजपचे बजरंग जाधव यांनी बंड कायम ठेवल्याने औश्यातील सामना बहुरंगी होईल़ उदगीर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ़ सुधाकर भालेराव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी आणि भाजपात लढत होईल़ अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेश सदस्य दिलीपराव देशमुख यांनी मात्र बंडाचे निशाण कायम ठेवले आहे़ शिवाय, यापूर्वीच अयोध्याताई केंद्रे यांनी वंचितकडून लढण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यामुळे अहमदपुरातही लढत बहुरंगी होईल़