उदगीर : उदगीर-जळकोट मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या वतीने गुरुवारी केंद्र व राज्य शासनाच्या कारभाराविरुद्ध मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले.
उदगीर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चास ११ वाजता सुरुवात करण्यात आली. यावेळी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. हा मोर्चा शहरातील मुख्य रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी बसवराज पाटील नागराळकर होते. सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टिका करून येणाऱ्या काळात या सरकारला पायऊतार करण्याचे आवाहन केले. यानंतर उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रा. शिवाजी मुळे, कल्याण पाटील, रंगा राचुरे, माजी आ. मनोहर पटवारी, उषा कांबळे, ॲड. प्रभाकर काळे, मधुकर एकुर्केकर, मन्मथप्पा किडे, मारोती पांडे, चंद्रकांत टेंगेटोल, आजीम दायमी, प्रा. शिवाजी देवनाळेआदीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणे झाली. मंचावर सभापती शिवाजी हुडे, माजी आ. शिवराज तोंडचीरकर, शिलाताई पाटील, प्रिती भोसले, अरुणा लेंडाणे, व्यंकटराव पाटील, गजानन सताळकर, श्रीमंत सोनाळे, अजीत शिंदे, सोपानराव ढगे, चंदन पाटील नागराळकर, ज्ञानेश्वर पाटील, चारूशिला पाटील, बंटी कसबे, फेरोज देशमुख, संतोष बिरादार, ॲड. पद्माकर उगीले आदींसह उदगीर व जळकोट तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उदगीर जिल्ह्याची निर्मिती करावी...सोयाबीनला भाव नाही त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. विद्यार्थी व बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, उदगीर महसूल विभागात गुंठेवारीच्या नावाखाली होणारी लूट बंद करावी, आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, उदगीर जिल्हा निर्माण करावा, उदगीर येथील शासकीय दूध योजना तात्काळ एनडीडीबीमार्फत सुरू करावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या.