औसा (जि. लातूर) : तालुक्यातील बिरवली ग्रामपंचायतअंतर्गत झालेल्या विकासकामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार गटविकास अधिकाऱ्याकडे केली. मात्र, त्याचीही चौकशी झाली नाही. याबाबत माहिती अधिकाराखाली विचारणाऱ्या राजेंद्र बळीराम कांबळे यांना सरपंच, ग्रामसेवकांनी माहिती दिली नाही. याप्रकरणी सोमवारी झालेल्या ग्रामसभेत कांबळे यांनी अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपसरपंचांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी राजेंद्र कांबळे यांना भादा पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, बिरवली ग्रामपंचायतीच्या वतीने नियमबाह्य पद्धतीने विकासकामे केल्याचा आराेप केला असून, याची चाैकशी करावी अशी मागणी तक्रारदार कांबळे यांनी केली आहे. एकाही कामावर फलक बसविण्यात आला नाही. शिवाय, संबंधितांनी याबाबत चौकशी केली नाही. या प्रकरणाच्या चाैकशीसाठी साेमवारी गावात झालेल्या ग्रामसभेत राजेंद्र कांबळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. याबाबत त्यांनी चार दिवसांपूर्वीच आत्मदहन करण्याचा इशारा दिला हाेता. तर संबंधित तक्रारदार विकासकामामध्ये अडथळा निर्माण करतो. माहिती विचारली म्हणून मी धमकी दिली, हा आराेप चुकीचा आहे, असे प्रवीण चव्हाण म्हणाले.