- संदीप शिंदेलातूर : हवेत, पाण्यावर लग्न करण्याच्या हौस असणारे बक्कळ आहेत. काहींना धावत्या रेल्वेत, विमानात ही लग्न करायचे असते. मात्र, एका अविलयाने ट्रक कंटेनरमध्ये वातानुकूलित सभागृह थाटून देशाच्या कानाकोपऱ्यात कोठेही जाऊन लग्न करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यांच्या या अभिनव प्रयोगाची बातमी लोकमतमध्ये उमटल्यानंतर सोशल मीडियात चर्चा वाढली आहे.
निलंगा तालुक्यातील राठोडा येथील दयानंद दरेकर गेल्या २० वर्षांपासून मंडप, डेकोरेशनचा व्यवसाय करतात. कोराेना काळात सर्वकाही ठप्प असताना त्यांनी ट्रकलाच मंगल कार्यालय करण्याचा निर्णय घेत तो सत्यात उतरवला. तब्बल ५० लाख रुपये खर्च करुन त्यांनी ट्रकलाच सर्वसुविधायुक्त मंगल कार्यालय बनवले आहे. यात साऊंड सिस्टम, लाईट, जनरेटर, स्टेज, ३०० वऱ्हाडी बसतील अशी खुर्चीची व्यवस्था, जेवणाची सुविधा तसेच एसीचा ही समावेश आहे. लग्न, वाढदिवस, पार्टीसह विविध कार्यक्रमांसाठी हे चालते-फिरते, आधुनिक व सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात मंगल कार्यालय उपलब्ध करुन दिले आहे.
आनंद महिंद्रा यांनीही केले ट्विट...फिरत्या मंगल कार्यालयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अन् त्याची दखल उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेत फिरत्या मंगल कार्यालयाचा व्हिडिओ ट्विट करत कौतुक केले. दरम्यान, दयानंद दरेकर यांनी महिंद्रा यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता लवकरच भेट होणार असल्याचेही दयानंद दरेकर यांनी सांगितले.