लातूर- नांदेड महामार्गाची दुरवस्था
लातूर : जिल्ह्यातील महत्त्वाचा असलेल्या लातूर ते नांदेड या महामार्गाची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी माेठमाेठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरील प्रवासाला दुप्पट वेळ लागत आहे. काही ठिकाणी खड्डे भरणे, रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, ते संथगतीने सुरू असल्याचा आराेप त्रस्त नागरिक, वाहनधारकांतून केला जात आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी हाेत आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
वाढवणा परिसरात रबीचा पेरा वाढला
वाढवणा बु. : उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. सुकणी, हाळी-हंडरगुळी, किनी यल्लादेवी, एकुर्का राेड, मन्ना उमरगा, खेर्डा, डाेंगरशेळकी, केसगीरवाडी, बेळसांगवी, डांगेवाडी, डाऊळ, हिप्परगा, कल्लूर, आडाेळवाडी, अनुपवाडी, इस्मालपूर परिसातील प्रकल्पात जलसाठा माेठ्या प्रमाणावर झाला आहे. परिणामी, यंदा रबीचा पेरा माेठ्या प्रमाणावर वाढला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हरभरा पिकाचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, रबीच्या पिकावर राेगाचा प्रार्दुभाव कायम आहे.
डांगेवाडी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
वाढवणा बु. : उदगीर तालुक्यातील डांगेवाडी ते वाढवणा या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपसाून दुरवस्था झाली आहे. रस्ता पूर्णत: उखडला आहे. परिणामी, वाहनधारक, ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी गत अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र, याकडे लाेकप्रतिनिधी, संबंधित प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हाेत असल्याचा आराेप, त्रस्त ग्रामस्थ, वाहनधारकांतून हाेत आहे. डांगेवाडी ग्रामस्थांसाठी हा एकमेव मार्ग आहे.
ग्रामीण भागातील लघु उद्याेग पूर्वपदावर
लातूर : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लघु उद्याेगातील उलाढाल मंदावली हाेती. आता टप्प्या-टप्प्याने हे उद्याेग पूर्वपदावर आली असून, उलाढालही वाढत आहे. परिणामी, सामान्यांना यातून राेजगार मिळत आहे. मात्र, घेतलेले कर्ज कसे फेडायचे हीच चिंता छाेट्या-छाेट्या व्यावसायिकांना सतावत आहे. काहींनी बचतगट, बँकाकडून व्यवसायासाठी भांडवल म्हणून कर्ज घेतले आहे. सदरचे कर्ज शासनाने माफ करावे, अशी मागणी आता जाेर धरू लागली आहे.