लातूर: मनोज जरांगे मराठवाड्यातील शांतता रॅलीच्या निमित्ताने लातूरात आले आहेत. दरम्यान, मागील १२ दिवसापासून अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात उपोषणाला बसलेले धनगर समाजाच्या दोन तरुण चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयकर यांची प्रकृती खालावली आहे. याबाबत माहिती मिळताच त्यांची विचारपूस करण्यासाठी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी आज उपोषणस्थळ गाठले. उपोषणकर्त्यांच्या मागण्या जाणून घेत जरांगे यांनी सर्व मराठा समाज तुमच्या मागे असल्याची ग्वाही दिली.
मनोज जरांगे पुढे म्हणाले, जो मार्ग सत्य असेल त्यात आम्ही आपल्या सोबत आहोत. समाजाच्या न्याय, हक्काच्या मागण्यासाठी पुढे आलेच पाहिजे. राजकारणी हे जाती जातीत तेढ निर्माण करत असतात. आपण काही राजकारणी नाहीत. आपण आपल्या समाजासाठी, लेकरा बाळाच्या भविष्यासाठी काम करत असतो. धनगर समाजाच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्याचा सरकारने गांभीर्याने विचार करायलाच पाहिजे. ते कायदा सोडून काही मागत नाहीत, त्यांच्या हक्काचे मागत आहेत. त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात ही माझी प्रामाणिक मागणी आहे, असेही जरांगे म्हणाले. तसेच सत्तेत येण्यापूर्वी सत्ता आल्याबरोबर धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्याची पूर्तता मागील दहा वर्षापासून झाली नाही. आमरण उपोषण करण हा डेंजर प्रकार आहे. सरकारनं या लेकरांची काळजी घेतली पाहिजे, असे मत जरांगे यांनी व्यक्त केली आहे.
पालकमंत्र्यांनी तत्काळ दखल घ्यावीधनगर तरुणांचे उपोषण बारा दिवसापासून सुरू आहे तरीही अद्याप पालकमंत्री गिरीश महाजन यांनी याची दखल घेतली नाही. त्यांच्यापर्यंत विषय गेला होता, तरी ते इथे आले नाहीत. अशी माहिती जरांगे यांना यावेळी देण्यात आली. यानंतर जरांगे म्हणले की, मी इथे राजकारण करण्यासाठी आलो नाही. कुणी जर बेमुदत उपोषण करत असतील तर त्यांच्या वेदना मला माहित आहेत. मराठा आणि धनगर समाज याच्या मध्ये वाद नाही. राजकारणी ते लावत असतात. हा विषय गंभीर आहे. गिरीश महाजन साहेबांनी येथे नक्कीच भेट द्यावी. उपोषणकर्त्यांचं काय म्हणणं आहे, ते ऐकून घ्यावं. असे आवाहनही जरांगे यांनी यावेळी केले.