राजकुमार जाेंधळे, लातूर: मराठा समाजाच्या आरक्षणाआड जाे काेणी येईल, त्याला आयुष्यभर गुलाल लागू द्यायचा नाही, वेळ येईल तेव्हा आरक्षणाच्या मार्गात आडवे येणाऱ्यांची नावेही जाहीर करणार असल्याचा इशारा मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनाेज जरांगे-पाटील यांनी रेणापूर पिंपळ फाटा (जि. लातूर) येथे शुक्रवारी रात्री १०:३० वाजता झालेल्या विशाल सभेत बाेलताना दिला.
रेणापूर येथे शुक्रवारी मनाेज जरांगे-पाटील यांची विशाल सभा झाली. त्यांचा पाचव्या टप्प्यातील दाैरा सुरू आहे. ते यानिमित्त लातूर जिल्ह्यात आले हाेते. झालेल्या विशाल सभेत मनोज जरांगे-पाटील म्हणाले, मराठा आरक्षणामध्ये जे काेणी अडथळा आणत आहेत, त्याचे नाव न घेता त्यांनी निशाणा साधला. आता देवही आडवा आला तरी आरक्षण मिळायचे थांबणार नाही, आरक्षण तर मिळणारच...अशी गर्जना त्यांनी लाखाे समाजबांधवांना संबाेधित करताना केली. रेणापुरातील सभेसाठी लाखाेंच्या संख्येने मराठा समाज एकवटला हाेता. आता ही लाट साधीसुधी नाही. तुमच्या नोटिसांना घाबरून ही लाट मागे हटणार नाही. धमक्यांना घाबरत नाही, आम्ही धमक्या देत नाही, आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून, सनदशीर मार्गाने हा लढा सुरू आहे. ही सभा नाही, तर मराठ्यांची वेदना आहे. मराठ्यांनी ८० टक्के लढाई जिंकली असल्याचे मनाेज जरांगे-पाटील यांनी सांगितले.
मी तुमच्याच जिवावर लढतोय...मराठ्यांनाे, मैदानात या...आता मागे हटायचे नाय, तुमच्या जिवावरच मी लढतोय. हे आरक्षण कसे देत नाहीत ते बघतो, नोटिसांना घाबरत नाही, आरक्षण घेतल्याशिवाय राहत नाही. मराठ्यांनी सावध व्हावे, एकजूट राहावे, अशी संधी पुन्हा येणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका, असे आवाहनही मनाेज जरांगे-पाटील यांनी समाजबांधवांना केले.
१२०० स्वयंसेवकांनी घेतला सभेसाठी पुढाकार...सभेसाठी सकल मराठा बांधवांच्या वतीने १ हजार २०० स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली हाेती. वेगवेगळ्या समित्यांचे गठन करण्यात आले हाेते. पाणीवाटप, सुरक्षारक्षक, पार्किंग, चहा-नाश्ता अशा जबाबदाऱ्या वेगवेगळ्या समित्यांकडे देण्यात आलेल्या हाेत्या.
मुस्लिम बांधवांकडून चहा, पाण्याची व्यवस्था...रेणापूर पिंपळ फाटा येथे मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने मोफत चहा, पाण्याचे स्टॉल लावण्यात आले होते. सभेसाठी येणाऱ्या वाहनांची सहा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. ही सभा लातूर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय मार्गालगत झाली. सायंकाळी ६ वाजल्यापासून वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू ठेवली होती. मराठा बांधव आपल्या लहान मुला-बाळांसह महिला कडाक्याच्या थंडीत पाच बसून होते.
सभास्थळी माेठा पोलिस बंदोबस्त तैनात...मनाेज जरांगे पाटील यांच्या विशाल सभेसाठी पाेलिस प्रशासनाने माेठा बंदाेबस्त तैनात केला हाेता. यामध्ये एक डीवायएसपी, चार पाेलिस निरीक्षक, १३ सहायक पाेलिस निरीक्षक, पाेलिस उपनिरीक्षक, १४४ पोलिस कर्मचारी, एक दामिनी पथक, दाेन आरसीपी पथक, एक एसआरपीएफ सेक्शन आणि ११६ होमगार्ड, चार वेगवेगळ्या पथकांचा समावेश हाेता.