लातूर : एमआयडीसी परिसरातील एका डाळ मिलमधून पाेलिसांनी चार बालकामगारांची सुटका केली असून, याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात एका ठेकेदाराविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध कारखाने, हाॅटेल्स, आस्थापनात बेकायदेशीरपणे बालकामगारांना बालमजुरीला जुंपणाऱ्याविराेधात कारवाई करण्याचे आदेश पाेलीस अधीक्षक साेमय मुंडे यांनी दिले आहेत. त्यांच्या आदेशावरून लातूर ग्रामीणचे उपविभागीय पाेलीस अधिकारी सुनील गाेसावी यांच्या पथकाने एमआयडीसी परिसरात असलेल्या कीर्ती डाळमिलवर छापा मारला. येथे चार अल्पवयीन मुले अतिजाेखमीचे काम करताना दिसून आली. त्यांना विश्वासात घेत चाैकशी केली असता, त्यांनी माहिती दिली. याच्या आधारे खाडगाव येथील अन्वर बरकत शेख याने अल्पवयीन मुलांना कामगार म्हणून डाळ मिलमध्ये कामाला लावल्याचे समाेर आले. ठेकेदारने बालकामगारांकडून कमी वेतनामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी डाळ मिलमध्ये धोकादायक मशिनरीच्या ठिकाणी कामगार म्हणून नियुक्त केले. शिवाय, अतिश्रमाचे काम करून घेत त्यांचे मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचे आढळून आले आहे. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात ठेकेदार अन्वर बरकत शेख (रा. खाडगाव रोड, लातूर) याच्याविराेधातत गुन्हा दाखल केला असून, चारही बाल कामगारांची सुटका करण्यात आली.
शिक्षणाच्या वयात हाताला काम...लहान मुलांना शालेय शिक्षण मिळायला हवे. संस्कार घडविण्याच्या वयातच त्यांना बालमजुरीला जुंपण्याचा प्रकार घडत आहेत. बालमजुरी प्रथेच्या निर्मूलनासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर विविध उपक्रम, जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहेत. मात्र, बालकांना कामावर ठेवू नये, असा कायदा असतानाही याचे उल्लंघन ठिकठिकाणी हाेताना आढळून येत आहे.
बालकामगार कायदा म्हणताे...अल्पवयीन मुला-मुलींकडून काम करून घेणे, त्यांना बालकामगार म्हणून कामाला लावणे हे बेकायदेशीर आहे. जर असा गुन्हा घडला तर त्याविराेधात कलम ३ (ए), १४ बालकामगार प्रतिबंध अधिनियम १९६८ अन्वये, त्याचबराेबर ७५ आणि ७९ अल्पवयीन न्याय कायदा २०१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे, असे पाेलिसांनी सांगितले.