लातूर : शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे. पुन्हा चातुर्वर्ण व्यवस्था, अंधश्रद्धा याला खतपाणी घालण्याचे काम सुरू झालेले आहे. यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शिक्षण विभागाने या बाबीचा गांभीर्याने विचार करून अभ्यासक्रमातून श्लोक वगळावेत, अन्यथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देत पक्षाच्या वतीने मनुस्मृतीच्या प्रतिमांचे पत्रक फाडून शुक्रवारी गांधी चौक येथे निषेध करण्यात आला.
राज्य शासनाच्या अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे. या संस्थेकडून पाठ्यक्रम शालेय अभ्यासक्रम ठरविला जातो. इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीतील श्लोक घेतले आहेत. त्याचा निषेध राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने करण्यात आला. निषेध म्हणून मनुस्मृतीच्या प्रतिमा फाडण्यात आल्या. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. युवक प्रदेश उपाध्यक्ष ॲड.निशांत वाघमारे, ॲड.शेखर हवेली, वक्तावर बागवान, इरफान शेख, चंद्रशेखर कत्ते, डी.उमाकांत, फिरोज पठाण, राहुल ढाले, अनिल विरेकर, बसवेश्वर रेकुळगे, रघुनाथ मदने, प्रवीण साळुंखे, आदर्श उपाध्याये, अंतेश्वर शितोळे, शंकर घोडके, पृथ्वीराज कापसे, शाहरुख पठाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.