लातूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत औसा रोडवरील शासकीय विश्रामगृहात सोयाबीन, कापसाच्या विषयावर शेतकऱ्यांची बैठक शनिवारी सकाळी ११ वाजता होती. मात्र, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तूपकर यांच्या बैठकीला विरोध केल्याने तुपकर यांनी विश्रामगृह सोडून इतर ठिकाणी ठरावीक कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. राजकीय पक्षाचे नेते, आमदार, खासदार, मंत्री, पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला इथे बैठक घेता येणार नाही, असे म्हणून मराठा आंदोलकांनी तुपकर यांच्या बैठकीला शासकीय विश्रामगृहात जाऊन विरोध दर्शविला तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. तुपकर हे सोयाबीन व कापसाचे दर पडल्याने शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी लातुरात आले होते. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बैठकीचे नियोजन केले होते. सकाळी विश्रामगृहातील बैठक रद्द झाल्यानंतर रविकांत तुपकर यांनी अंबाजोगाई रोडवरील एका हॉटेलात पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
शेतीचे शोषण झाल्याने आर्थिकस्तर खालावलामराठा आरक्षणासोबतच शेतमालाला रास्त भाव मिळावा ही मागणीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. कारण बहुतांश मराठा समाज हा शेतीवर अवलंबून आहे. शेतीचे शोषण झाले म्हणूनच मराठा समाजाचा आर्थिक स्तर खाली गेला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासोबतच सोयाबीन-कापसाला भाव मिळणे तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी माझा विदर्भ-मराठवाड्याचा दौरा सुरू आहे. त्या अनुषंगाने आज लातूर जिल्ह्याचा दौरा होता. परंतु, काही मराठा आंदोलकांनी यावेळी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा भावनांचा आदर करतो. मी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात पूर्वीपासूनच अग्रभागी आहे. त्याबद्दल कोणीही गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर...मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उभारलेल्या प्रत्येक लढ्यात माझा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. आरक्षण मिळावे या मागणीसाठी आम्ही नेहमीच आग्रही आहोत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळी मी रुग्णालयात होतो. त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधून पाठिंबा दिला होता, तर माझी पत्नी ॲड. शर्वरी तुपकर यांनी स्वतः जाऊन त्यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उभारलेल्या प्रत्येक लढ्यात माझा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. - रविकांत तूपकर.